जळगाव। औद्यागिक वसाहत परिसरातील सुप्रिम कंपनीतील कंत्राटी कामगाराने सावित्रीनगरातील राहत्या घरी साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. दरम्यान, याप्रकरणी औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर दिपक विकास पाटील (वय-35) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
कंपनीतील कामगार घरी आल्याने उघडकीस आली घटना
दिपक पाटील हे सावित्रीनगरात भाड्याच्या घरात पत्नी व मुलासह राहत होते. तर औद्यागिक वसाहत परिसरातील सुप्रिम कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून कामाला होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दिपक पाटील हे घरीच होते. पत्नी व मुलगा देखील काही दिवसांपूर्वीच गावाला गेले असल्यामुळे पाटील हे घरी एकटेच होते. त्यामुळे आज बुधवारी दुपारी घरात कुणी नसतांना पाटील यांनी साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास कंपनीतील कामगार मित्र उमेश रमेश शिरसाळे हा पाटील यांना कामावर घेऊन जाण्यासाठी दिपक पाटील यांच्या घरी आला. पाटील यांना आरोडी मारल्यानंतर घरातून कुणीच येत नसल्याने उमेश घरात प्रवेश करताच त्याला दिपक हा गळफास घेतलेला दिसून आला. यानंतर उमेश यांनी घरमालकांना दिपक याने गळफास घेतल्याचे कळविले. यानंतर औद्यागिक वसाहत पोलिस ठाण्यात घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून दिपक याला खाली उतरवून पंचनामा केला. यानंतर जिल्हा सामान्य रूग्णालयात नेल्यानंतर वैद्यकीय अधिकार्यांनी प्राथमिक तपासणी नंतर दिपक याला मृत घोषित केले. यावेळी कंपनीतील कामगारांनी रूग्णालयात गर्दी केली होती. दरम्यान, याप्रकरणी औद्यागिक वसाहत पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.