भुसावळ । येथील कंत्राटी कामगार कृती समितीतर्फे कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन सुरु करण्यात आले आहे. यादरम्यान आंदोलनात सहभागी झालेले कर्मचार्यांनी काळ्या फिती लावून कामकाज केले. तसेच सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास प्रवेशद्वारासमोर द्वारसभा घेण्यात येवून कामगारांनी जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने केलीत. या आंदोलनात बहुसंख्य कामगारांनी
सहभाग नोंदविला.
चुकीच्या धोरणामुळे कामगारांना अडचणी
याप्रसंगी कंत्राटी कामगार कृती समितीचे अध्यक्ष अरुण दामोदर यांनी उपस्थित कामगारांना संबोधित करताना सांगितले की, व्यवस्थापनाच्या चुकीच्या धोरणामुळे कर्मचार्यांना त्रास सहन करावा लागत आहे. कर्मचारी महावितरणच्या हितासाठी झोकून देऊन काम करीत असतात मात्र त्यांना त्याबदल्यात योग्य मोबदला दिला जात नाही. यासाठी व्यवस्थापनाने देखील कामगारांच्या हिताला प्राधान्य देऊन त्यादृष्टीने नियोजन करण्याची आवश्यकता असल्याचे सांगून प्रशासनाच्या कार्यशैलीवर ताशेरे ओढले. याप्रसंगी कंत्राटी कामगार संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष अरुण दामोदर, उपाध्यक्ष विक्रम चौधरी, कार्याध्यक्ष महेंद्र तायडे, सहसचिव चंद्रा अवस्थी यांनी उपस्थित कामगारांना मार्गदर्शन केले. सभेच्या यशस्वीतेसाठी सुनिल ठाकूर, कैलास झोपे, मधुकर इचवे, सचिन भावसार, कमलेश राणे, विकास पारधे, गणेश कराळे यांनी परिश्रम घेतले. प्रस्तावना व आभार समितीचे सचिव सचिन भावसार यांनी मानले.