भुसावळ। दीपनगर औष्णिक विज केंद्रातील युनिटट 3 सुरु करणे, कंत्राटी कामगारांचा बोनसचा प्रश्न निकाली काढणे, कंत्राटी कामगारांना देण्यात येणार्या गेटपास वर महानिर्मितीचा स्टॅम्प देणे व वसाहतीतील रिक्त गाळे कंत्राटी कामगारांना देणे या मागण्यांसाठी कंत्राटी कामगार संयुक्त कृती समितीतर्फे 7 फेब्रुवारी आंदोलन छेडण्याचा इशारा मुख्य अभियंता यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून चांगल्या स्थितीतील युनिट क्रमांक 3 बंद करण्यात आले आहे. यामुळे महानिर्मितीचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत आहे. कंत्राटी कामगारांना सात हजार रुपये बोनस देर्याचे धोरण सरकारने दिवाळी पुर्वीच जाहिर केलेले आहे. परंतु बोनस अद्याप दिलेला नाही. कंत्राटी कामगारांना देण्यात येणार्या गेटपासवर महाराष्ट्र विद्युत निर्मितीचा स्टॅम्प देण्यात आलेला नाही. या गेटपासवर महानिर्मितीचा अधिकृत स्टॅम्प लावून नवीन गेटपास देण्यात यावा. तसेच दिपनगर वसाहतीतील अनेक गाळे रिक्त असून त्यांची दुरावस्था झाली आहे. याबाबत व्यवस्थापनाने इतरांना गाळे दिले असतांना रिक्त असलेले गाळे कंत्राटी कामगारांना देण्याबाबत निर्णय घ्यावा. अशा मागण्यांसंदर्भात 15 दिवसांत निर्णय न घेतल्या 7 फेबु्रवारी पासून कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर अध्यक्ष अरुण दामोदर, उपाध्यक्ष विक्रम चौधरी, महेंद्र तायडे, कार्याध्यक्ष महेंद्र तायडे, सचिव सचिन भावसार यांच्या स्वाक्षर्या आहेत.