कंत्राटी धोरणामुळे देशातील कामगार असुरक्षित – शरद पवार

0

नवी मुंबई । एकेकाळी देशाला दिशा दाखवणारा कामगार आज असुरक्षित झाला असून देशोधडीला लागला आहे. त्यातच बाजार समिती कायदा रद्द करण्याचा निर्णय जर या सरकारने घेतला तर कष्टकरी माथाडी कामगारांना मोठी किंमत मोजावी लागेल, अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.

कामगारांबाबतची सरकारची धोरणे बदलायला लागली असून ही धोक्याची घंटा आहे, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. माथाडी कामगारांचे नेते आदरणिय अण्णासाहेब पाटील याच्या जयंतीनिमित्त सोमवारी नवी मुंबईत झालेल्या माथाडी कामगाराच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी शरद पवार यांचा सत्कारही करण्यात आला. काही वर्षांपूर्वी सातारा जिल्ह्यातील एक तरुण मुंबईत आला. कष्ट करण्याची तयारी आहे, त्यामुळे आपल्या भागातून आलेल्या कामगाराला त्याच्या घामाचे योग्य दाम मिळाले पाहिजे, याची जबाबदारी अण्णासाहेबांनी घेतली. माथाडी कामगार संघटनेचे रोपटे लावले आणि आज त्याचा वटवृक्ष झाल्याचे पवार म्हणाले.

या संस्थेत आज ठेवीपोटी तब्बल २५० कोटी रुपये आहेत. त्यातील किती पैसा परत किती येतोय याची मी चौकशी केली, तर कर्जालाही घेतलेला पैसा व्याजासहीत परत येतो आहे, असे मला समजले. हा अण्णासाहेबांचा आदर्श आहे. अशी संस्था माझ्या पाहण्यात कुठेच नाही, असे कौतुकही पवार यांनी केले.