धुळे । महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या तिनही वीज कंपनीतील 32 हजार कंत्राटी-बाह्यस्त्रोत कर्मचार्यांच्या विविध मागण्या गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यामुळे कंत्राटी कर्मचार्यांनी काल मध्यरात्रीपासून काम बंद आंदोलन सुरु केले. कर्मचार्यांच्या जीवनावश्यक मागण्यांकरीता वर्कर्स फेडरेशन चार वर्षांपासून पाठपुरावा करीत आहे. शासनाने स्थापन केलेल्या रानके कमिटी व नंतर अनुराधा भाटीया कमिटीसमोर संघटनांनी सर्व पुरावे सादर करुनही निर्णय झाला नाही. कर्मचार्यांच्या मागण्यांमध्ये सर्व कंत्राटी-बाह्यस्त्रोत कामगारांना ज्येष्ठतेप्रमाणे वीज कंपनीत कायम करावे, समान काम-समान वेतन धोरण लागू करावे, कर्मचार्यांना कायम करेपर्यंत रोजंदार कामगार पध्दत सुरु करुन वीज कंपनीत सामावून घ्यावे,नियमित रोजगाराची हमी द्यावी तसेच ज्येष्ठता यादी जाहीर करावी, परिपत्रकांचे पालन न करणार्या कंत्राटदारांवर कडक कारवाई करावी, या मागण्यांचा समावेश आहे. न्याय मिळेपर्यंत संप सुरु राहणार असल्याचेही वर्कर्स फेडरेशनने म्हटले आहे. निदर्शने करतेवेळी बी.डी. पाटील,सुभाष कोळी,गणेश वायकर, संजय पाटील,गणेश पाटील, घनश्याम पाटील,रमेश गवळी, राजेंद्र राजपूत, हरिष धुर्मेकर आदी कर्मचारी उपस्थित होते.
100 टक्के आऊट सोर्सिंग कामगाराचा संप
दोंडाईचा : महाराष्ट्र शासनाच्या अधिकार खालील तिन्ही कंपन्यातील असलेल्या कंत्राटी व आऊटसोर्सिंग कामगार बेमुदत संपावर गेले आहेत. सदर संपात महाराष्ट्रातील असलेले कंत्राटी व आऊटसोर्सिंग कामगार 32 हजार असून मा.ऊर्जामंत्री यांच्या म्हणण्यानुसार 22 हजार कामगार संपावर गेले आहेत.अशी माहिती त्यांनी दिली आहे. परंतु कृती समितीच्यावतीने 100 टक्के आऊट सोर्सिंग कामगाराचा संप यशस्वी झाला आहे. तरी महाराष्ट्र शासन तसेच तिन्ही कंपनीतील प्रशासनाने याची दखल घेण्यात यावी सदर कामगारांना रोजंदार कामगार म्हणून त्यांना कंपनीत घेण्यात येवून त्यांना कंपनीने न्याय द्यावा
सदर आऊट सोर्सिंग कामगार प्रामाणिकपणे राज्यातील तिन्ही विज कंपनीत प्रामाणिकपणे काम करीत आहेत. साक्री, धुळे, शिंदखेडा, दोंडाईचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कंत्राटी व आऊटसोर्सिंग कामगार संपावर उतरलेले आहेत. धुळे येथे बी.डी.पाटील, एम.जी.धिवरे, सुभाष कोळी तसेच साक्री येथे भारत कुंवर, किरण नांद्रे, दोंडाईचा येथे कॉ.नाना पाटील,विशाल पाटील, राजू मराठे, अनिल माळी, कैलास तिरमले, डि.पी.ठाकूर यांनी मार्गदर्शन केले. न्याय न मिळाल्यास संप सुरुच राहिल असे आऊटसोर्सिंग कामगारांनी आश्वासन दिले.