मुंबई । मुंबई महापालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन खात्यात कंत्राटी सफाई कर्मचार्यांना थकबाकी न देता नोकरीवरून काढण्यात आले. याबाबत पालिका प्रशासनाला जाब विचारायला आलेल्या कंत्राटी कर्मचार्याला प्रशासनाने भेट न दिल्याने घन कचरा विभागाचे उपायुक्त विजय बालमवार यांच्या कार्यालयात त्या कर्मचार्याने फाशी लावून घेण्याचा प्रयत्न केला.
सफाई कर्मचार्यांना कायमस्वरूपी नोकरी द्यावी व थकबाकी द्यावी, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाने निर्देश दिल्यानंतरही पालिकेने 150 कंत्राटी सफाई कर्मचार्यांना नोकरीवरुन काढले आहे. नोकरीवरुन काढताना प्रत्येक कर्मचार्याला 1 लाख 32 हजार इतकी थकबाकी पालिकेने दिलेली नाही. नोकरी गेल्याने व थकबाकी मिळत नसल्याने या कंत्राटी कर्मचार्याची उपासमार होऊ लागली होती.
याबाबत कंत्राटी कर्मचारी आपल्याला न्याय मिळावा म्हणून पालिका आयुक्तांना भेटायला आले होते. आयुक्तांनी या कर्मचार्यास अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांच्याकडे पाठवले, देशमुख यांनी घन कचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त विजय बालमवार यांच्याकडे भेटीला पाठवले. परंतू बालामवार यांनी या कर्मचार्याला भेटण्यास नकार दिल्याने परमेश्वरी गणेशन या महिला कर्मचार्याने नैराश्यातून फाशी लावून आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. परमेश्वरी गणेशन यांना वेळीच त्यांच्या सोबत असलेल्या इतर कर्मचारी व श्रमिक कचरा वाहतुक संघटनेचे मिलिंद रानडे यांनी अडवल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नसला तरी कर्मचार्यांमध्ये नाराजी पसरली.