सावदा। रावेर तालुक्यात यंदा सुमारे 700 हेक्टरवर हळदीची लागवड झाली होती. यातून एकरी ओल्या हदळीचे सरासरी 200 क्विंटल उत्पादन अपेक्षित होते. मात्र, जास्त पावसाने हळदीची कायीक वाढ झाली तरी कंदाची अपेक्षित वाढ झाली नाही. यामुळे एकरी उत्पादनात सरासरी 50 क्विंटलची घट आली आहे.
रावेर तालुक्यात सध्या हळदीची काढणी सुरू आहे. मात्र, गतवर्षाच्या तुलनेत यंदा झालेला जास्त पाऊस आणि जानेवारी महिन्यात करप्याच्या प्रादुर्भावाने हळद पिकाला पोखरले होते. याचे परिणाम उत्पादनावर झाले. गतवर्षी तालुक्यात ओल्या हळदीचे एकरी सरासरी 200 क्विंटल उत्पादन हाती आले होते. यंदा हा आकडा 130 ते 150 क्विंटलपर्यंत घसरला आहे. सद्यस्थितीत सर्वाधिक हळद लागवड असलेल्या निंभोरा परिसरात हळद कंद उकळून सुकवण्याची कामे सुरू आहेत. मात्र, तापमान 41 अंशांपर्यंत गेल्याने तप्त बॉयलरजवळ थांबून हळद उकळण्याचे काम जिकिरीचे ठरते.