कंपनीच्या महाव्यवस्थापक महिलेकडे दहा कोटी रुपयांची खंडणीची मागणी

0

मुंबई – गोरेगाव परिसरातील एका खाजगी कंपनीच्या महाव्यवस्थापक आणि सीईओ असलेल्या महिला व्यावसायिकाकडे दहा कोटी रुपयांची खंडणीची मागणी करणार्‍या एका 60 वर्षांच्या वयोवृद्धाला काल गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. रविंद्रकुमार गोविंदलाल खैरा असे या वयोवृद्ध आरोपीचे नाव असून खंडणीच्या याच गुन्ह्यांत त्याला येथील स्थानिक न्यायालयाने 21 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील तक्रारदार महिला व्यावसायिक असून त्यांची गोरेगाव येथे एक खाजगी कंपनी आहे. याच कंपनीत त्या महाव्यवस्थापक आणि सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीत त्यांचे 35 टक्के शेअर्स, तसेच पतीसह अन्य एका महिलेचे उर्वरित शेअर आहेत. गेल्या वर्षी त्यांच्या भागीदार असलेल्या महिलेने कंपनीत कोट्यवधी रुपयांचे गैरव्यवहार केले होते. मात्र कंपनीच्या बदनामीमुळे त्यांनी या प्रकाराची माहिती उघड केली नव्हती.

याच दरम्यान त्यांना एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन त्यांच्या कंपनीचे आर्थिक सर्व गैरव्यवहार उघड करण्याची तसेच शासकीय यंत्रणेच्या मदतीने त्यांच्या कंपनीच्या कार्यालयात छापा टाकण्याची धमकी दिली होती. ही कारवाई टाळण्यासाठी तसेच आयकर विभागासह इतर शासकीय यंत्रणेला मॅनेज करण्यासाठी त्याने त्यांच्याकडे दहा कोटी रुपयांची खंडणीची मागणी केली होती. भयभीत झालेल्या तक्रारदारांनी आरोपीची गोरेगाव येथे भेट घेऊन त्याला दहा लाख रुपये दिले होते. तसेच कोणालाही ही माहिती देऊ नका अशी विनंती केली होती. त्यानंतर तो पुन्हा पुन्हा त्यांना कॉल करुन खंडणीच्या उर्वरित रक्कमेची मागणी करीत होता. या घटनेनंतर त्यांनी त्यांच्या हिंतचितकांसह नातेवाईकांशी चर्चा करुन खंडणीची मागणी करणार्‍या व्यक्तीविरुद्ध दिडोंशी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत त्याचा तपास गुन्हे प्रकटीकरण विभागाला सोपविला होता. हा तपास हाती येताच या पथकाने तक्रारदाराची भेट घेऊन आरोपीला गोरेगाव येथे खंडणीचा दुसरा हप्ता घेण्यासाठी बोलविण्याची सूचना केली. काल सायंकाळी गोरेगाव येथील वेस्टीन हॉटेलजवळ रविंद्रकुमार खैरा हा खंडणीचा हप्ता घेण्यासाठी आला होता, यावेळी त्याला तिथे पाळत ठेवलेल्या गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. चौकशीत रविंद्रकुमार हा मूळचा दिल्लीचा रहिवाशी असून सध्या तो जोगेश्वरीतील पाटलीपूत्र नगरात राहत होता. त्याच्या राहत्या घराची पोलिसांनी झडती घेतली असता तिथे पोलिसांना विविध बँकेचे क्रेडिट आणि डेबीट कार्ड, व्हिझिटिंग कार्डसह इतर आक्षेपार्ह कागदपत्रे सापडली. त्यात तक्रारदाराच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या कागदपत्रांचा समावेश होता. याच कागदपत्रांच्या आधारे तो त्यांना ब्लॅकमेल करुन त्यांच्याकडे खंडणीची मागणी करीत होता. त्याच्याकडे ते कागदपत्रे कशी आली, त्यांना ते कागदपत्रे कोणी दिले याचा आता पोलीस तपास करीत आहे. विशेष म्हणजे गुप्तचर विभागासह आयकर विभागातील काही अधिकारी आपल्या परिचित असून त्यांच्या मदतीने आपण त्यांच्या कंपनीचे आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण दडपून टाकाते असेही त्याने महिला तक्रारदार व्यावसायिकांना सांगितले होते.