कंपन्यांतील किंमती माल चोळणारी टोळी जेरबंद

0

शहापुर: शहापुर जवळील आसनगाव परिसरातील कंपन्यांमधील किमती माल चोरून नेणार्या उत्तरप्रदेश येथील पाच जणांच्या टोळक्याला शहापूर पोलिसांनी आसनगाव जवळ मोठ्या शिताफीने जेरबंद केले आहे. कंपनीतल्या मालाने भरलेल्या टेम्पोसह तीन लाखाचा माल तसेच चोरट्यांजवळ असलेली तलवार, चॉपर व दोन टॉमी (पहार) अशी शस्त्रे जप्त करण्यात आली असून पोलिसांनी प्रशांत रमेश सिंग, मोहम्मद हसन बक्रीदी खान, मोहम्मद अय्युब शब्बीर अहमद शाह, अब्दुल सईद बक्रीदी खान व अन्वर अली मुसिबत अली या पाच चोरट्याना अटक करण्यात आली आहे.

सापळा रचून घेतले ताब्यात
आसनगाव परिसरातील कंपनीत चोरी होणार असल्याची खबर शहापूर पोलिसांना मिळाल्यानंतर तातडीने पोलीस निरीक्षक महेश शेट्ये, सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना दुसाणे, पोलीस हवालदार कैलास पाटील, काशिनाथ सोनवणे, नांगरे व चालक देवराम शिंदे या पोलीस पथकाने मुंबई – महामार्गावर आसनगाव येथील फूडवे या हॉटेल जवळ पाळत ठेवली होती. त्यानूसार दुपारच्या सुमारास कंपनी परिसरातून महामार्गाच्या दिशेने चाललेल्या एका संशयित टेम्पोला अडवून चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे देऊन चोरट्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफीने पाचही जणांच्या मुसक्या आवळल्या.

तीन लाखांचा माल जप्त
टेम्पोची तपासणी केली असता त्यात इलेक्ट्रिक मोटर चे 490 नग, बफिंग मोटर चे दोन नग, ब्रासपार्ट च्या 12 गोणी, ऍल्युमिनियम चोकचा एक बॉक्स व 15 इंची मोटर चे सहा नग असा सुमारे दोन लाखाचा ऐवज व टेम्पो असा तीन लाखाचा माल शहापूर पोलिसांनी जप्त केला आहे. हा सर्व माल आसनगाव येथील कंपनीतील आहे. या चोरट्यानी या गुन्ह्यासह अन्य एका गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती तसेच पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील व उपअधीक्षक विशाल ठाकूर यांनी दिलेल्या सूचनेनुसार अधिक तपास सुरू असल्याचे माहिती देताना पोलीस निरीक्षक महेश शेट्ये यांनी सांगितले.