पुणे । पुणे महापालिकेची कचरा वाहने चालविण्यासाठी ठेका पद्धतीने चालक पुरविण्याचे काम श्री एंटरप्रायजेस आणि मे. जय भवानी एंटरप्रायजेस यांना प्रत्येकी 5 कोटी रुपये याप्रमाणे 10 कोटी रुपयांना देण्याची निविदा पालिका प्रशासनाने स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवली आहे.
पुणे महापालिका कचरा वाहने चालविण्यासाठी ठेका पद्धतीने चालक घेते. त्यासाठी पालिकेने निविदा मागविल्या होत्या. त्यात श्री एंटरप्रायजेस आणि मे. जय भवानी एंटरप्रायजेस यांचे बाजारभाव, मागील निविदांचे दर तसेच अन्य निविदा दरांशी तुलना करता, दोन्ही ठेकेदार यांच्याबरोबर पालिका प्रशासनाने तडजोड करून दर कमी करून घेतले आहेत. टाटा 1109, 1112, 1210, 1510, आयशर, लेलॅन्ड कॉमेट, कॉमेट गोल्ड, कॉमेट सुपर, लेलॅन्ड 1616 या एचजीव्ही ट्रान्स्पोर्ट वर्गातील वाहनासाठी प्रती ड्रायव्हर 12 तासांसाठी रोज 650 रुपये ठरविण्यात आले आहेत. टाटा 407, 709, 712, आयशर टिपर, घंटा टिपर, लाइट कॉम्पॅक्टर व डंपर प्लेसर एलएमव्ही ट्रान्स्पोर्ट वर्गातील वाहनांसाठी प्रती ड्रायव्हर 9 तासांसाठी 640 रुपये निश्चित करण्यात आले आहेत. टाटा एस., बजाज जी. सी. मॅक्स, पियाजो अॅपे महिंद्रा जियो या तीन आणि चारचाकी वाहनांसाठी प्रती ड्रायव्हर 9 तासांसाठी 620 रुपये निश्चित करण्यात आले आहेत. या दरानुसार श्री एंटरप्रायजेस आणि मे. जय भवानी एंटरप्रायजेस यांच्याकडून प्रत्येकी 5 कोटी याप्रमाणे एकूण दहा कोटी रुपयांपर्यंत काम करून घेण्यात यावे. राज्य सरकारने वेळोवेळी निश्चित केलेल्या नवीन वाढीव महागाई भत्त्यासह अदा करून त्यांच्याबरोबर करारनामा करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने ठेवला आहे. या कामासाठी ‘जीएसटी’ लागू झाल्यास त्यापोटी येणारी रक्कम देण्यात यावी, असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.