कचरावेचकांकडून 218 कि. ‘ई-वेस्ट’ जमा

0

धायरी । कचरावेचकांकडून संकलित झालेल्या ई-वेस्टला पहिल्यांदाच प्रति किलो 15 तर टाकाऊ प्लास्टिकला 5 रुपये हमी भाव देण्यात आला आहे. गोळा झालेल्या ई-वेस्टवर शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया करण्यात येणार आहे. धायरी व मुळशी येथे कचरावेचकांकडून 218 किलो ई- वेस्ट गोळा करण्यात आले आहे.
धायरी येथे झालेल्या कार्यक्रमात प्रकाश म्हस्के, अनिल मिसाळ, महादेव कसबे, अमोल कसबे या कचरावेचकांना ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’चा परवाना देण्यात आला. यावेळी एन्व्हायरमेंटल क्लब ऑफ इंडियाचे नीलेश इनामदार, वनराईचे रवींद्र धारिया, क्लीन गार्बेजचे विलास पोकळे, जनाधारचे ललित राठी, पर्यवेक्षक सचिन सूर्यवंशी उपस्थित होते.

कचरा परवानाधारक कंपनीला
कचरावेचकांकडून ई- वेस्ट गोळा केले जात आहे. याकरिता मुळशी येथे अभियान राबविण्यात आले. एन्व्हायरमेंटल क्लब ऑफ इंडिया, वनराई, जन आधार, क्लीन गार्बेज आणि लायन्स क्लब या संस्थांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. या संस्थांच्या माध्यमातून सर्व प्रकारचा ई-कचरा आणि इतर टाकाऊ प्लास्टिक गोळा करण्यात येणार आहे. गोळा करण्यात आलेला एकत्रित मिश्रित कचरा परवानाधारक कंपनीला दिला जाणार आहे. पुढेही ई-कच-याला प्रति किलो 15 रुपये हमी भाव दिला जाणार आहे. तर टाकाऊ प्लस्टिकला 5 रुपये हमी भाव दिला जाणार आहे.

योग्य भाव देणचे आवाहन
कचर्‍याच्या प्रतवारी प्रमाणे त्याला योग्य भाव देण्यात येईल, असे आवाहन एन्व्हायरमेंटल क्लब ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आले आहे. धायरी येथे ई-वेस्ट व टाकाऊ प्लास्टिक कचर्‍याचे संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा, तसेच नवीन योजनांचा लाभ घ्यावा. यामुळे ई-वेस्ट आणि टाकाऊ प्लस्टिक कचर्‍याच्या समस्येचे समूळ उच्चाटन होण्यास मदत होईल, असे आवाहन करण्यात आले.