कचरा कुंडीची दोन कप्प्यात विभागणी करा

0

जळगाव। शहरातून कचरा गोळा करतांना ज्याप्रमाणे घंटागाडीचे ओला व सुका कचरा जमा करण्यासाठी दोन भाग करण्यात येतात त्याच प्रमाणे कचरा कुंडीचे दोन कप्पे करण्याची सूचना भाजपाचे पृथ्वीराज सोनवणे यांनी स्थायी समितीच्या सभेत मांडली. याप्रसंगी व्यासपीठावर स्थायी सभापती वर्षा खडके, सहाय्यक उपायुक्त लक्ष्मीकांत कहार, नगरसचिव अनिल वानखेडे उपस्थित होते.

सहाय्यक उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांनी सोनवणे यांच्या प्रश्‍नला उत्तर देतांना सांगितले की, स्वच्छ भारत अभियानातंर्गत घरोघरी जावून कचरा गोळा करून गाडीतच कचर्‍याचे वर्गीकरण करण्याचे निर्दश आहेत. यानुसार प्रशासन काम करीत असल्याने कचरा कुंडीवर अशा प्रकारे खर्च करणे संयुक्तीक नसल्याची भूमिका मांडली. यावेळी सोनवणे यांनी घंटागाडीत कोण कचरा टाकतो किंवा कोण कचरा टाकत नाही याची यादी तयार करा. जेणेकरून जे नागरिक घंटागाडीत कचरा टाकत नसतील अशा नागरिकांना प्रत्यक्ष भेटून कचरा घंटागाडीत टाकण्याची विनंती करणार असल्याचे सांगितले.

कचरा न टाकणार्‍यांची मागितली यादी
घंटागाडीत कचरा न टाकणार्‍यांची यादी बनविण्याची मागणी गेल्या तीन महिन्यांपासून करीत असून आरोग्य अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सोनवणे यांनी सभागृहात केला. आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील यांनी उत्तर देतांना त्यांच्या नेहमीच्या शैलीत उद्यापासून यादी करणार असल्याची माहिती सभागृहाला दिली. यावर सोनवणे यांनी, इतर विभागातील अधिकारी नगरसेवकाची काही तक्रार असल्यास स्वतः विचारणा करीत असतात मात्र, डॉ. विकास पाटील हे तक्रारींचे निवारण करीत नसल्यानेच स्थायी सभेत तसेच महासभेत आरोग्य विभागाच्या तक्रारी कराव्या लागत असल्याचे सांगितले.

मोकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरणाची मागणी
शहरात मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला असून नागरिकांच्या जिवीतास धोका उत्पन्न झाल्याने मनपातर्फे कोणती उपाययोजना करण्यात आली आहे याची विचारण पृथ्वीराज सोनवणे यांनी यावेळी केली. मोकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याची मागणी सोनवणे यांनी केली असता सहाय्यक उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांनी कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी सात वेळा टेंडर काढण्यात आले परंतु, प्रतिसाद मिळालेला नसल्याची माहिती दिली. सोनवणे यांनी 14 व्या वित्तआयोगाच्या निधीतून हा खर्च करण्याची मागणी केली असता तशा आशयाचे पत्र शासनास पाठविण्याचे आदेश सभापती वर्षा खडके यांनी दिले आहेत.

पडक्या इमारतीबाबत ठोस कार्यवाहीची अपेक्षा
शहरातील पडाऊ घरांची माहिती मनपाने घ्यावी तसेच इमारत पडून अपघात होण्याची शक्यता सोनवणे यांनी वर्तविली. पडाऊ इमारतींबाबत कोणते धोरण अवलंबिली आहे याची विचारणा पृथ्वीराज सोनवणे यांनी केली. तसेच या पडाऊ इमारतीच्या भाडेकरूंना संरक्षण आहे का याची विचारणा केली. प्रभाग समिती अधिकारी व्ही. ओ. सोवनणी यांनी उत्तर देतांना सांगितले की, पडाऊ घर खाली करतांना भाडेकरूंना कोणताही प्रकारचा करारनामा करण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितले. एैन पावसाळ्याच्या तोंडावर व मुख्यमंत्री फडणवीस यांनी कालच जाहीर केलेल्या पडक्या इमारतीच्या धोरणाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

ख्रिश्‍चन दफनभूमीची दुरावस्था
नगरसेविका गायत्री शिंदे यांनी शिवाजीनगर येथील ख्रिश्‍चन कब्रस्तानमध्ये ऐन पावसाळ्यात होणार्‍या दुरावस्थेबाबत बैठकीचे लक्ष वेधून घेतले. या दफनभूमीत गटारींसह येणार्‍या पावसाचे पाणी जात असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच याबाबत आरोग्य अधिकारी व बांधकाम अधिकार्‍यांकडे वारंवार तक्रार करूनही उपयोग होत नसल्याची तक्रार केली. आरोग्य विभाग व बांधकाम विभाग एक दुसर्‍यांकडे टोलवाटोलवी करीत असल्याचा आरोप गायत्री शिंदे यांनी स्थायीत केला.