कचरा जाळणार्‍या कर्मचार्‍यांवर नाममात्र कारवाई

0

हडपसर : काळेपडळ रेल्वे लाईनजवळील (प्रभाग 23) कचरापेटीत महापालिकेच्या कर्मचार्‍यांंनी कचरा पेटवला. त्याची तक्रार नागरिकांनी केली. मात्र, पालिका कर्मचार्‍यांनी कचरा पेटविल्याने नाममात्र दंड आकारुन संबंधितांवर कारवाई करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाचे पुणे शहराध्यक्ष योगेश जगताप यांनी क्षेत्रीय कार्यालयात, महापालिका, महापौर व आयुक्तांकडे याबाबत तक्रार केली होती. कचरा पेटवणे या गुन्ह्यात 5000 रूपयांची दंडाची तरतूद असूनही कारवाईच्या नावावर अवघ्या 100 रूपयांचा दंड या कर्मचार्‍यांवर लावून कारवाई करण्यात आली. येथे कचरापेटी कायम ओसंडून वाहत असते. त्यामुळे या भागातील मोकाट जनावरेही वाढली आहेत. असा कचरा पेटविल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळणार्‍या अशा ठेकेदारांचा ठेका रद्द करून संबंधित कर्मचारी निलंबित करण्याची मागणी जगताप यांनी केली. अशी कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.