कचरा टाकण्यावरून झाला खून : पिता-पूत्रांना शिक्षा
हिंगोण्यातील खून प्रकरणी भुसावळ सत्र न्यायालयाचा निकाल
भुसावळ : यावल तालुक्यातील हिंगोणो येथे अंगणात कचरा टाकण्यावरून 28 वर्षीय युवकाचा डोक्यात लाकडी दांडा मारून खून करण्यात आला होता. या प्रकरणी हिंगोण्यातील पिता-पूत्रांविरोधात फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करून भुसावळ न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. खून प्रकरणी न्यायालयाने आरोपी सोनल उर्फ संदीप सुभाष पाटील (34) यास सात वर्ष तर सुभाष देविदास पाटील (64) यास दोन वर्ष शिक्षेसह चार हजारांचा दंड भुसावळ अतिरीक्त न्यायालयाचे सत्र न्यायाधीश आर.एम.जाधव यांनी सुनावला.
कचरा टाकल्यावरून झाला होता खून
यावल तालुक्यातील हिंगोणा येथील रहिवासी नितीन पांडुरंग बाविस्कर (28, धोबी) यांच्याशी संशयीत आरोपी सोनल उर्फ संदीप सुभाष पाटील (34) यास सात वर्ष तर सुभाष देविदास पाटील (64) यांचा अंगणात कचरा टाकण्यावरून वाद झाला होता. संशयीत सुभाष पाटील यांनी घरात लाकडी दांडा आणून संदीपच्या हातात दिल्यानंतर आरोपीने नितीन यांच्या डोक्यात मारल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. 7 सप्टेंबर 2019 रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. दोन्ही आरोपींविरोधात फैजपूर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती.
साक्ष ठरली महत्त्वाची
भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायाधीश आर.एम.जाधव यांच्या न्यायासनापुढे खटल्याचे कामकाज चालले. सरकार पक्षातर्फे नऊ साक्षीदार तपसण्यात आले. मयताची आई गीताबाई, डॉ.निलेश देवराज व तपास अधिकारी तत्कालीन सहाय्यक निरीक्षक प्रकाश वानखेडे यांची साक्ष ग्राह्य धरण्यात आली. संशयीत आरोी सुभाष यास दोन वर्ष व आरोपी सोनल यास सात वर्ष कारावासाच्या शिक्षेसह चार हजारांचा दंड सुनावण्यात आला. सरकारतर्फे सरकारी अभियोक्ता अॅड.प्रवीण पी.भोंबेर यांनी आरोपीतर्फे अॅड.पी.के. देशमुख आणि अॅड.हिंमत सूर्यवंशी यांनी काम पाहिले तर पैरवी अधिकारी म्हणून एएसआय समीना तडवी यांनी सहकार्य केले.