बाधित गावांना कचराकुंडीचे स्वरुप

0

फुरसुंगी : महापालिकेने कचराडेपो बाधित गावांचा कचरा उरुळी-फुरसुंगी डेपोत टाकण्यास बंदी घातल्याने या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात कचराकोंडी होऊन येथील रहिवाश्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे पालिकेने कचराडेपोचा निर्णय लागेपर्यंत तीन ते चार महिने या गावांना उरुळी देवाची, फुरसुंगी कचराडेपो येथे कचरा टाकू देण्याची विनंती या गावांतील पदाधिकार्‍यांमार्फत महापालिका प्रशासनास करण्यात आली आहे.

पुणे महापालिका हद्दीलगत औताडेवाडी-हांडेवाडी, मांजरी, वडकी, होळकरवाडी, वडाचीवाडी, उंड्री, पिसोळी या गावांचा कचरा अनेक दिवसांपासून पालिकेच्या उरुळी देवाची, फुरसुंगी येथील कचराडेपोत आणून टाकला जातो. मात्र येथील ग्रामस्थांनी तीन महिन्यांपूर्वी कचराडेपोचे आंदोलन मागे घेतल्यानंतर पालिका प्रशासनाने उरुळी देवाची व फुरसुंगी गावे वगळता इतर या गावांना येथील कचराडेपोत कचरा टाकण्यास बंदी केली आहे. संबंधित गावांनी येथील कचराडेपोत कचरा टाकल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णयही महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे या गावातील ग्रामस्थांनी पालिकेच्या या भूमिकेबाबत संताप व्यक्त केला आहे.

याबाबत या गावांतील पदाधिकारी अशोक न्हावले, मंगल झांबरे, जिजाबा बांदल, नवनाथ मासाळ, मच्छिंद्र दगडे, निवृत्ती बांदल, नितिन घुले, प्रवीण आबनावे यांच्या शिष्टमंडळाने पालिकेत जाऊन महापौरांची गाठ घेऊन त्यांना याबाबत निवेदन दिले. याबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे आश्‍वासन यावेळी महापौर मुक्ता टिळक यांनी शिष्टमंडळास दिले.

गावांची मुस्कटदाबी
शहरालगतच्या या गावांमध्ये कचरा जिरविण्याची सोय नसल्याने या गावांनाही पालिकेच्या कचराडेपोवर अवलंबून राहावे लागत आहे, मात्र या गावांचा कचरा बंद करून पालिका एकप्रकारे या गावांची मुस्कटदाबी करीत आहे. त्यामुळे या गावांमध्ये जागोजागी कचर्‍याचे ढीग साठत आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाने या गावातील रहिवाश्यांचे आरोग्याचा प्रश्‍न लक्षात घेऊन कचरा टाकण्यास परवानगी द्यावी.
– अशोक न्हावले (मा.उपसरपंच, हांडेवाडी)