मुंबई । कचर्याचे डब्बे वितरण न केल्याप्रकरणाचे पडसाद सोमवारी महापालिका सभागृहात उमटले. शिवसेना-भाजपच्या नगरसेविका यावेळी आपापसात चांगल्याच भिडल्या. सुमारे दहा मिनीटे सभागृहात गोंधळ सुरु होता. या गोंधळातच महापौरांनी अर्थसंकल्पाचा प्रस्ताव सभागृहाच्या पटलावर ठेवल्याने वादावर पडदा टाकला. चारकोप येथील शिवसेनेच्या नगरसेविका संध्या दोशी यांनी, सुमारे साडे पाच हजार कचर्यांच्या डब्ब्यांचे वितरण न करता गोदामात साठवून ठेवल्याचा आरोप भाजपच्या नगरसेविका अंजली खेडेकर यांनी हरकतीचा मुद्दा चर्चेला आणला.
पारदर्शक सरकारची घोषणा करणार्यांचे हाच का पारदर्शक कारभार, असा टोला त्यांनी भाजपला लगावला. सभागृह नेते यशवंत जाधव यांनीही भाजपवर टीका केली. या टिकेचे पर्यवसान बाचाबाचीत झाले. भाजपच्या नगरसेवकांनी शिवसेनेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सभागृहात दहा मिनिट घोषणाबाजी सुरु होती. भाजपच्या नगरसेविका अंजली खेडेकर, ज्योती अळवणी आणि राजश्री शिरवाडकर आणि शिवसेनेच्या राजूल पटेल, किशोरी पेडणेकर यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. अखेर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी अर्थसंकल्पाचा प्रस्ताव मंजुरी करिता पटलावर ठेवल्याने वातावरण निवळले.
कचर्याचे डबे गेले कुठे?
नगरसेवकनिधीतून 500 डब्बे मिळाले होते. त्यापैकी 450 डब्ब्यांचे वितरण केले असून 50 डब्ब्यांचे वितरण करणे, बाकी असल्याचा खुलासा सभागृहात केला. मात्र, भाजपच्या नगरसेविकांनी हे डब्बे 2015 ते 2016 मधील असल्याचा आरोप केला. या आरोपांचे प्रभाग समिती अध्यक्षा शितल म्हात्रे यांनी खंडन केले. भाजपचे नगरसेवक प्रशासनावर दबाव आणण्यासाठी दमदाटी केली. अधिकार्याला कोंडूनही ठेवले. शिवसेनेच्या नगरसेवकांनी त्यांची सुटका केली, अशी बाब त्यांनी सभागृहाच्या निर्दशनात आणून दिली.