कचरा डेपोचा त्रास, विविध प्रकल्प फक्त नावालाच

0

मोशी रहिवाश्यांचा डेपोला विरोध

मोशी : मोशी परिसरात कचरा डेपोला लागलेल्या भयानक आगीने सर्वांचे लक्ष वेधले असून, आग लागल्यानंतर त्याचे लोळ भर रस्त्यावरून दिसत होते. अद्यापही परिसरात धुराचे लोळ पसरले असून कचरा डेपोचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सुफलाम व आरोग्यदायी असलेले शेतकरी वर्गाची लक्षणीय संख्या असलेले एक गाव. गाव महापालिकेत समाविष्ट करण्याबाबत गावात विविध मते होती अखेरीस गावाचा पालिकेत समावेश झाला़ मात्र या गावाच्या लोकांना आजतागायत भेडसावत असलेला मुख्य प्रश्‍न म्हणजे आ वासून असलेला कचरा डेपो. बोजहाडेवाडीकडून येताना समोर नजरेस दिसतो, तो मोशी कचरा डेपोचा भव्य डोंगर. डेपोवरून अनेक राजकीय पक्षांनी आपली पोळी भाजून घेतली आहे. हाल झाले ते मोशीकरांचे हे वास्तव आहे.

नवीन डेपोला परवानगी नाही
अद्यापही डेपोत लागलेल्या आगीमुळे धूर धुपसत असून त्याचा त्रास आजूबाजूच्या परिसरातील रहिवासी सहन करत आहे़ प्रशासन केवळ तात्पुरत्या स्वरूपाची उपाययोजना म्हणून लागलेली आग विझवण्याचे प्रयत्न करत आहे. आत्तापर्यंत आग विझवण्यासाठी 50 ते 60 टँकर पाणी मारण्यात आले आहे. कायमस्वरूपी आग विझावी म्हणून आगीवर मातीही टाकण्यात येत आहे. शहरातील दैनंदिन कचरा या डेपोमध्ये आणून त्यावर प्रक्रिया करून विविध प्रकल्प उभारले जातील. अशा प्रकारे या डेपोची सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळामध्ये कचरा डेपोला स्थानिक रहिवाशांनी विरोधदेखील केला. या डेपोत असलेले प्रकल्प फक्त नावालाच असून अनेक प्रकल्प आद्यपही सुरू करण्यात आले नाही. नवीन कचरा डेपोला परवानगी नाही़ मुख्यमंत्र्यांनी नवीन कचरा डेपोला यापुढे परवानगी देण्यात येणार नसल्याचे सांगितले आहे़ त्यामुळे शहरात अन्य ठिकाणी कचरा डेपो होणार नाही हे वास्तव आहे़

सध्या मोशी गावाचा मुख्य प्रश्‍न सोडवण्यासाठी राजकीय पक्षाबरोबर या भागातील स्थानिक व गावकरी, सर्वसामान्य नागरिकांचे योगदान मोलाचे ठरणार आहे. कचरा डेपोचे गावावर होणारे विपरीत परिणाम लक्षात घेऊन या कचरा डेपो प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी सर्वांनी एकत्र लढा उभा करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी स्थानिक गावकी, भावकी एकवटणार आहे.