कचरा निविदा अडकली पुन्हा वादात

0
आठ वर्षांसाठी दोन ठेकेदारांना काम देण्याचा आहे निर्णय
एका ठेकेदाराची उच्च न्यायालयात धाव; फेरनिविदेवर आक्षेप
पिंपरी-चिंचवड : शहराचे दोन भाग करून आठ वर्षांसाठी दोनच ठेकेदारांना कचरा संकलनाचे काम देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. मात्र  तो निर्णय वादग्रस्त ठरल्याने ती निविदा रद्द करून फेरनिविदा काढण्याचा सोपस्कार प्रशासनाला करावा लागला. आता ही निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना या निविदेशी संबंधित ए. जी. एन्व्हायरो ठकेदाराने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे या निविदा प्रक्रियेच्या बाबतीत महापालिकेच्या मागे शुक्लकाष्ट लागले आहे. ही निविदा प्रक्रिया आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात
पहिल्या निविदेमध्ये शहराच्या एका भागासाठी बीव्हीजी कंपनी व दुसर्‍या भागासाठी ए. जी. एनव्हायरो कंपनीस काम मिळालेले आहे. या कामाला स्थायी समितीने मंजुरी दिल्यानंतर गैरव्यवहाराचे आरोप झाल्याने स्थायी समितीने हे काम रद्द करण्याचा निर्णय घेतला. नंतर प्रशासनाने फेरनिविदा काढल्यानंतर पुन्हा दर कमी केल्याने स्थायीने त्या दोन ठेकेदारांना काम देण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, प्रशासन फेरनिविदा राबविण्यावर ठाम राहिल्याने आता ही निविदाप्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
निविदेत भाग नव्हता 
ही निविदा चार भागात काढली असून एकूण सुमारे 45 कोटी खर्चाचे हे काम आहे. आधीच्या निविदेत पात्र ठरलेल्या ठेकेदारांपैकी बीव्हीजीने पुन्हा निविदा भरली. परंतु, एनव्हायरो याने फेरनिविदेत सहभाग घेतला नाही. त्यानंतर त्याीं सोमवारी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यांनी फेरनिविदेवर आक्षेप घेतल्याची माहिती आहे. संबधित कंपनीच्या अधिका-यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकलेला नाही.
चुकीच्या नियोजनाचे आरोप
कचरा निविदाप्रक्रियेचे चुकीचे नियोजन आरोप आणि वादामुळे यापूर्वीच या कामाला विलंब झाला. त्यात ठेकेदाराने न्यायालयात धाव घेतल्याने या निविदेला पुन्हा आडकाठी निर्माण झाली आहे. त्यामुळे काल याचिका दाखल होताच महापालिका आरोग्य विभागाने याचिकेची सविस्तर माहिती घेतली. त्यावर मंथन सुरू झाले असून प्रशासनाने महापालिका विकलांना याचिकेची माहिती अभ्यासासाठी पाठविली असल्याचे एका अधिकार्‍याने सांगितले.