कचरा निविदा रद्दचा ठराव पोहचला नाही : आयुक्त

0

क्लीनचिटचा अहवाल स्थायी समोर ठेवणार

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने कचरा संकलन व कचरा वहन कामासाठी काढलेली निविदा रद्द केल्याचा ठराव अद्याप माझ्याकडे आला नाही. ठराव आल्यावर त्यावर उचित निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. तसेच रद्द केलेल्या निविदेला राज्य सरकारने क्लिनचिट दिली आहे. याबाबतचा अहवाल देखील स्थायी समितीसमोर ठेवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

महापालिकेने पिंपरी-चिंचवड शहरातील घरोघरचा कचरा गोळा करून तो मोशी कचरा डेपोपर्यंत नेऊन टाकण्याच्या कामासाठी निविदा प्रक्रिया राबविली होती. शहराच्या आठ प्रभाग क्षेत्रातील कचरा गोळा करणे, त्याची मोशी कचरा डेपोपर्यंत वाहतूक करण्याचे काम पालिकेने ए. जी. इनव्हायरो इंन्प्रा प्रोजेक्टस आणि बीव्हीजी इंडिया या कंपनीला दिले होते. यासाठी वार्षिक 56 कोटींचा खर्च येणार होता. तसेच हे काम आठ वर्षांच्या कालावधीसाठी देण्यात आले होते. तसेच ठेकेदाराला दरवर्षी निश्‍चित स्वरुपात दरवाढ देण्यात येणार होती. विशेष म्हणजे पूर्वीप्रमाणे प्रभागनिहाय कंत्राट न देता पुणे-मुंबई महामार्गाचा मध्यबिंदू मानून पिंपरी-चिंचवड शहर दोन भागात विभागण्यात आले होते.

दरम्यान, यामध्ये मोठा गोलमाल झाला असल्याचे आरोप होवू लागले. स्थायी समितीमध्ये निविदा मंजूर करण्यास देखील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने विरोध केला होता. त्यांनी स्थायी समितीला प्रश्‍नावलीच पाठविली होती. परंतु, त्याला दाद न देता सत्ताधार्‍यांनी हा विषय बहुमताच्या जोरावर रेटून नेला होता. वाढत्या आरोपानंतर या निविदेचा कार्यारंभ आदेश थांबविण्यात आला. तसेच त्याची राज्य सरकारकडून चौकशी देखील करुन घेण्यात आली. परंतु, चौकशी अहवालाच्या एक दिवस अगोदर स्थायी समितीत सदस्यांनी प्रस्ताव करुन हा ठराव रद्द केला. दुसरर्‍याच दिवशी निविदा प्रक्रिया योग्य असल्याचा अहवाला पालिकेला प्राप्त झाला होता.

फेरनिविदा काढण्याचे काम सुरू
आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महापालिकेने कचरा संकलन व कचरा वहन कामासाठी काढलेली निविदा रद्द केल्यानंतर आता स्थायी समितीच्या निर्देशानुसार नव्या फेरनिविदा काढण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल करण्यात येणार आहे. दिवाळीपर्यंत कचर्‍याचे निविदांचे काम पूर्ण होईल. तोपर्यंत आहे त्या संस्थांना मुदतवाढ देण्यात येईल. अथवा तात्पुरत्या कालावधीसाठी निविदा काढली जाईल