कचरा प्रकल्पाच्या विरोधात पंतप्रधानांना साकडे

0

हडपसर । रामटेकडी औद्योगिक वसाहतमधील संभाव्य कचरा प्रकल्पास हडपसरकरांनी कडाडून विरोध केला आहे. या प्रकल्पास विरोध दर्शविण्यासाठी ससाणेनगर नागरी कृती समितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली आहे.

पुणे महानगरपालिकेच्या हडपसर विभागामध्ये सध्या अस्तित्वात असलेला कचरा प्रकल्प याचा विचार न करता पुणे महानगरपालिकेकडून अजून एका कचरा प्रकल्पाची हडपसरवासीयांना भेट मिळत आहे. या प्रकल्पामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण हडपसरवासीय या प्रकल्पास विरोध करीत आहेत. भाजप व्यतीरिक्त इतर पक्षातील सर्व नगरसेवकांनी या प्रकल्पास विरोध म्हणून लेखी निवेदन दिले आहे. तरीही त्याचा विचार न करता पुणे महानगरपालिका व महापौरांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या कचरा प्रकल्पाच्या उद्घाटनाचा घाट घातला होता. या कार्यक्रमाला हडपसरवासीयांनी कडाडून विरोध केला आहे. याचा परिणाम म्हणून भाजपला उद्घाटन कार्यक्रम रद्द करण्याची वेळ आली. ससाणे नगर नागरी कृतीचे समन्वयक मुकेश वाडकर यांनी आपल्या भागातील कचरा प्रकल्पाची समस्या थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मांडली आहे. नरेंद्र मोदी यांनी दखल घ्यावी, या न्यायाच्या प्रतीक्षेत हडपसरवासीय आहेत.

प्रकल्प हाणून पाडू
या कचरा प्रकल्पास विरोध करण्यासाठी जास्तीत जास्त नागरीकांनी पीएमओ या पोर्टलवर जाऊन पुणे महानगरपालिका व महापौर यांच्या विषयी तक्रार नोंदवावी, असे आवाहन ससाणे नगर नागरी कृती समितीने हडपसरवासीयांना केले आहे. एकीने निषेध केल्यास हा प्रकल्प हाणून पाडला जाईल. तरीही लोक भावनेचा विचार न करता निर्णय घेतला तर उग्र आंदोलन करून हा प्रकल्प बंद केला जाईल, असा इशारा समितीने दिला आहे.

तीव्र आंदोलनाचा इशारा
या कचरा प्रकल्पावर पर्याय म्हणून पुणे महानगर पालिकेने प्रत्येक प्रभागात स्वतंत्र कचरा प्रकल्प, कंपोस्ट खत प्रकल्प करून कचरा जिरवावा. संपूर्ण शहराचा कचरा हडपसरला का? आम्ही पालिकेचा अन्याय कदापी सहन करणार नाही. याविरोधात तीव्र आंदोलन केले जाईल.
– योगेश ससाणे, नगरसेवक