कचरा प्रकल्पाविरोधात रणशिंग

0

कचरा मुक्त हडपसर समिती छेडणार भाजपविरोधात श्राद्ध आंदोलन

हडपसर । पुणे महापालिकेच्या रामटेकडी औद्योगिक वसाहत येथील संभाव्य कचरा प्रकल्पाच्या विरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी व जनतेने जनआंदोलन सुरू केले असून कचरा प्रकल्प हटावसाठी रणशिंग फुकले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व जनता करणार असून पालिकेतील सत्ताधारी भाजपविरोधात श्रद्धा आंदोलन छेडण्याचा निर्धार व्यक्त केला हडपसर मध्ये होणार्‍या उपद्रवी प्रकल्पा विरुध्द सर्वपक्षीय लढा सुरू झाला आहे.

पुणे महापालिकेच्या सत्ताधारी भाजपच्या हट्टापायी रामटेकडी औद्योगिक वसाहत येथे कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे काम सुरू केले आहे. या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी हडपसर गांधी चौक येथे बैठक झाली. या बैठकीस सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, माजी आमदार महादेव बाबर, प्रभाग समिती अध्यक्ष योगेश ससाणे, नगरसेवक नाना भानगीरे, राम खोमणे, संजय शिंदे, प्रशांत सुरसे, अमोल हरपळे, चंद्रकांत मगर, जयसिंग गोंधळे, मुकेश वाडकर, सागर भोसले, भानुदास शिंदे, प्रवीण ताथोड या बैठकीत सहभाग घेऊन तीव्र शब्दांत विरोध दर्शविला.

रामटेकडी येथील कचरा प्रकल्पाजवळ जाऊन सर्वांनी महापालिका प्रशासन व सत्ताधारी च्या विरोधात घोषणा देऊन निषेध केला. आगामी आंदोलनाची लवकरच दिशा ठरविली जाणार असल्याचे योगेश ससाणे यांनी सांगितले.

७५० टनचा प्रकल्प
१० एकर ताब्यात आहे, १३ एकर अजून ताब्यात येणार आहे शहरात १६५० टन कचरा निर्माण होतो कचर्‍याची दुर्गंधी येणार, आरोग्याला धोका निर्माण होईल. शहराच्या चारही बाजूला कचरा जिरविणारे प्रकल्प करा, सत्ताधारी जाहीरनामा मध्ये टाकतात प्रत्येक प्रभागात कचरा जिरविणार. हे फेकू राजकारण चालू आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन करण्याचा प्रकार भाजपकडून सुरू आहे. हडपसर मध्ये घातक प्रकल्प लादले तर आम्ही सर्वपक्षीय विरोध करू. – चेतन तुपे, विरोधी पक्षनेते, मनपा

घाणेरडे प्रकल्प हडपसरवर लादतात
हडपसरच्या आमदारांना लोकांच्या आरोग्याची काळजी नाही. स्थानिक भाजप नगरसेवक मूग गिळून गप्प आहेत. हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. सर्वपक्षीय तीव्र लढा उभारला जाईल. कचरा प्रकल्पामुळे बोअर, विहिरी, कालव्याचे पाणी दूषित झाले, सत्ताधार्‍यांना माज आलाय हा माज काढण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे. घाण सिटी पुणे शहरातील सर्व घाणेरडे प्रकल्प हडपसर विधानसभा मतदारसंघात आणले जातात. मेलेल्या जनावरांचा विसावा आमदार टिळेकर यांच्या घरासमोर करावा, अशी उपहासात्मक मागणी केली. आमदार मेधा कुलकर्णी कचर्‍याला विरोध करतात आणि हडपसरचे आमदार घाणेरडे प्रकल्प हडपसरवर लादतात. सर्व एकत्र आलेले असताना आमदार फिरकत नाहीत. यावरून त्यांचे गांभीर्य किती आहे हे लक्षात येते. हडपसर कचरा प्रकल्प आंदोलन पक्षविरहीत समजून सर्वांनी एकत्र येऊन लढावे. जनता नेतृत्व करेल आम्ही मागे असू. हडपसर कचरा मुक्त कृती समिती स्थापन करून प्रकल्पाला विरोध केला जाईल. जेलभरो आंदोलनही करू. – महादेव बाबर, माजी आमदार

भाजपच्या नगरसेवकांनी फिरवली पाठ
हडपसरमधील सर्वपक्षीय नगरसेवक व कार्यकर्ते कचरा प्रकल्पास विरोध करण्यासाठी एकत्र आलेले असताना भाजपच्या नगरसेवकांनी मात्र कानाला हात लावत पाठ फिरवली. जनतेने निवडून दिलेले आमदार योगेश टिळेकर यांनाही नागरिकांच्या आरोग्याचे देणेघेणे नाही, असा आरोप या बैठकीत व्यक्त करण्यात आला. भाजप जाणूनबुजून असे प्रकल्प हडपसरला राबवित असून सत्ताधारी भाजप नगरसेवक व आमदार गांभीर्याने बघत नसल्याने त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. आगामी काळात आंदोलनाची दिशा तीव्र केली जाणार असल्याने सत्ताधारी भाजप बॅकफूटवर जाण्याची शक्यता आहे.

न्यायालयात जाणार!
हडपसरच्या जनतेचा नव्या कचरा प्रकल्पास विरोध आहे. आमच्या भावनांशी खेळू नका, सत्ताधारी मनगटशाही दाखवून प्रकल्प राबवित आहे. आम्ही जशास तसे उत्तर देऊ. स्थानिक आमदाराच्या भावाचा येथील एक प्रकल्प घेतला आहे सर्व कागदपत्रे घेऊन न्यायालयात जाणार आणि हा डाव हाणून पाडणार. – योगेश ससाणे, प्रभाग समिती अध्यक्ष – नगरसेवक