कचरा प्रकल्पास नागरिकांचा विरोध

0

पंतप्रधान मोदींना पत्र लिहून नाराजी

हडपसर । महापालिकेच्यावतीने हडपसर रामटेकडी औद्योगिक वसाहत येथील कचरा प्रकल्पाचा संघर्ष पेटला असून नागरिकांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना ऑनलाइन तक्रार केली आहे. अद्याप भाजप स्थानिक नगरसेवकांनी भूमिका स्पष्ट न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

पूर्व भागातील राजकीय नेते व नागरिक एकत्र येत नसल्यानेच येथील विकास खुंटला आहे. सर्व आरोग्यास घातक प्रकल्प पालिकेमार्फत हडपसरमध्ये साकारले जात आहेत, पण रामटेकडी औद्योगिक वसाहतीमधील कचरा प्रकल्पाविरोधात मात्र चांगलीच एकी निर्माण झाली असून सर्वपक्षीय मैदानात उतरले आहेत.

हडपसरच्या सामाजिक कार्यकर्त्या स्मिता गायकवाड यांनी थेट पोर्टलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून तक्रार नोंदवली आहे.

आमदार, नगरसेवक मूग गिळून गप्प
कचरा डेपोच्या विरोधात भाजप आमदार नगरसेवक काहीच बोलत नाहीत हा आपल्या सगळ्यांच्या अस्मितेचा प्रश्‍न आहे. बापटसाहेब आपण आमचे पालकमंत्री आहात की दडपण देऊन काम करून घेणारे मंत्री! कसले हे आमदार कातडी बचावचे धोरण करत आहेत; धिक्कार आहे अशा आमदारांचा ज्यांना आम्ही मत दिले. कोथरूडच्या आमदार मेधा कुलकर्णी कचरा डेपोला विरोध करतात हे आमदार आणि नगरसेवक मात्र मूग गिळून गप्प का? विरोध करतीलच कसे त्यांच्या भावालाच कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे ना तेथील कचरा प्रकल्पाचे. – हेमंत ढमढेरे, सामाजिक कार्यकर्ते

आमदार किंवा त्यांचे नातेवाईक नाही…
रामटेकडी येथील कचरा प्रकल्पाचे कंत्राट हे माझ्या माहितीनुसार आमदार यांचे बंधू किंवा नातेवाईक यांचे नसून त्याचे मालक हे सुयश काळेले व आसवानी हे आहेत वेबसाइटवर संपूर्ण माहिती आहे. कृपया चौकशी करून आरोप करावे. – संदीप दळवी, भाजप पदाधिकारी

पोलीस बंदोबस्तात काम सुरू
हडपसर प्रभाग समिती अध्यक्ष योगेश ससाणे, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार महादेव बाबर यांनी सोमवारी सुरू असलेले प्रकल्पाचे काम बंद पाडून तेथील कर्मचार्‍यांना हाकलून दिले होते. परंतु, रामटेकडी औद्योगिक वसाहतीतील नियोजीत कचरा प्रकीया प्रकल्पाचे काम पोलिस बंदोबस्तात सुरू करण्यात आले. लोकशाही पध्दतीने पोलिसांची परवानगी घेवून आंदोलन करावे, तसेच महापालिकेचे काम बंद ठेवावे असे पत्र दाखवावे, तरच हे काम थांबवावे अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल अशी लेखी समज योगेश ससाणे यांना वानवडी पोलिसांनी दिली आहे. यामुळे प्रकल्पावरून वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

विरोधात तीव्र आंदोलन
ससाणे नगर नागरी कृती समिती व सर्व नागरिक रामटेकडी कचरा प्रकल्पाच्या विरोधात तीव्र विरोध करत आहेत. या परिसरात सध्या अस्तित्वात असलेले जे कचरा प्रकल्प आहेत ते बंद करावेत. नवीन कचरा प्रकल्प तर लोकांच्या जीवावर उठलाय. नागरिकांनी मिळून पंतप्रधान यांना पत्र लिहून हा कचरा प्रकल्प नको अशी जाहीर भूमिका घेतली आहे. सत्ताधारी भाजपने कचरा प्रकल्प लादला तर विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल. – मुकेश वाडकर, सामाजिक कार्यकर्ते