कचरा प्रक्रियेची निविदा रद्द करा

0

पुणे । ओला कचर्‍यावर प्रक्रिया करण्याच्या निविदा प्रक्रिया सदोष असून व्यक्तिगत हितसंबंध जपण्यात आले आहेत. त्यामुळे यामध्ये पालिकेचे आर्थिक हित पाहण्यात आलेले नाही. त्यामुळे ओला कचर्‍यावरील प्रक्रिया करण्याची निविदा रद्द करावी, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक बाळा ओसवाल यांनी आयुक्ताकडे केली आहे. पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने ओला कच-यावर प्रक्रिया करणारी निविदा काढली होती. त्यासाठी तीन ठेकेदार आले. त्यात अजिंक्य बायोफर्ट हा पालिकेचा थकबाकीदार असताना त्याला या निविदा प्रक्रियेत अवैधरित्या पात्र ठरविण्यात आले आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने निकोप ऐवजी कृत्रिम बनावट स्पर्धा रंगविली आहे. अवघ्या 20 लाख रुपये किंमतीची मशीन घेऊन कचरा बारीक करून त्यावर प्रक्रिया करून प्रति टन तीन हजार रुपयाने संबंधित ठेकेदार विकत आहे. या ठेकेदाराला पालिका पुणेकरांचे 45 कोटी रुपये देणार आहे. त्यामुळे यात पालिकेचे आर्थिक हित पाहण्यात आलेले नाही. त्यामुळे या निविदेची त्रयस्थ समिती नेमून चौकशी करावी. संबंधित अधिका-यांना निलंबित करावे. अन्यथा याबाबत लोकायुक्त किंवा न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा इशारा ओसवाल यांनी दिला आहे.