कचरा प्रक्रियेपेक्षा त्याच्या वाहतुकीचा खर्च जास्त

0

पुणे । महापालिकेच्या कार्यक्षेत्रात येणार्‍या भागातील एक टन कचर्‍याची वाहतूक करण्यासाठी पालिकेला तब्बल 1 हजार 557 रुपये खर्च आला आहे. तर एक टन कच-यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रत्येक प्रकल्पाच्या अटी आणि शर्तीनुसार टिफींग फी (महापालिकेकडून देण्यात येणारा खर्च) पोटी पालिकेला 300 ते 1 हजार 111 रुपये खर्च येत आहे. त्यामुळे कचरा प्रक्रियेवर खर्च कमी अणि कचरा वाहतुकीवर खर्च जास्त होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शहरात रोज 1 हजार 600 टन कचरा जमा होतो. या कचर्‍यावर पालिका शहरातील विविध भागातील प्रकल्पामध्ये प्रक्रिया करते. घराघरातून कचरा गोळा करणे आणि कच-याचे ओला आणि सुका असे वर्गीकरणाचे काम केले जाते. त्यानंतर तो कचरा गाडयांमधून प्रकिया प्रकल्पापर्यंत नेला जातो. त्यामुळे कचरा वाहतुकीवर प्राथमिक आणि दुय्यम वाहतूक असा होतो. 2017 -18 यामध्ये आतापर्यंत आलेल्या एकूण खर्चानुसार एक टन कचरा वाहतुकीसाठी पालिकेला तब्बल 1 हजार 557 रुपये खर्च आला आहे. या वाहतुकीवर वर्षभरात तब्बल 80 कोटी रुपये खर्च होत आहे, अशी धक्कादायक माहिती शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी सर्वसाधारण सभेला विचारलेल्या लेखी प्रश्‍नाच्या उत्तरातून पुढे आली आहे.