मानवी हक्क संरक्षण समितीची मागणी
सांगवीः महाराष्ट्र शासनाने नुकताच प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला असून मागील आठवड्यापासून त्या निर्णयाची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जात आहे. त्यामुळे भयभीत झालेले नागरिक शक्य तेवढे प्लास्टिक घरातून बाहेर टाकत आहेत. याचाच परिणाम नवी सांगवी येथील मयूर नगरीसमोर दिसून आला. रस्त्यावर कचरा टाकण्यासाठी ठेवलेल्या कचरा कुंड्या प्लास्टिक कचर्यामुळे ओव्हरफुल झाल्या. कचरा कुंड्या भरल्याने प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणात कुंड्यांच्या आजूबाजूला पडला आहे. मयूर नगरीसमोर ठेवण्यात आलेल्या कचराकुंड्या दररोज ओसंडून भरतात. त्यात प्लास्टिक बंदीमुळे प्लास्टिक कचर्याची आणखी भर पडली आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी महापालिका प्रशासनाला विनंती करण्यात आली आहे. अशी माहिती विकास शहाणे, अॅड. सचिन काळे, संगिता जोगदंड, मुरलिधर दळवी यांनी दिली.
दोनवेळा कचरा उचलण्याची मागणी
गेल्या पाच वर्षापासून दिवसातून दोनवेळा कचरा उचलण्यासाठी मागणी वारंवार नागरिकांमधून केली जात आहे. सकाळी आठ वाजता एकदा कचरा उचलला जातो. त्यानंतर उपनागरातून घंटा गाड्या, आजूबाजूच्या सोसायट्याचा कचरा तेथेच टाकला जातो. भाजी विक्रेतेही त्या ठिकाणी सडलेली भाजी टाकतात. हॉटेलमधील कचरा रात्री अकरा नंतर त्याच कचरा कुंडीत टाकला जातो. त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात कचरा कुंडीबाहेर कचरा पडलेला असतो. सकाळी मोकाट कुत्री, जनावरे येऊन आणखी राडा करतात. रस्त्याने जाणार्या नागरिकांना नाकाला हात लावून गेल्याशिवाय पर्याय नाही. तसेच यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे.
प्रभाग अध्यक्षांच्या आदेशाची पायमल्ली
‘ह’ प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे यांनी या भागातील कचरा दिवसातून दोन वेळा उचलण्यासाठी वेळोवेळी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. मात्र प्रशासन त्यांच्याही आदेशाची पायमल्ली करीत आहे. नुकत्याच झालेल्या स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत लोणावळा नगरपरिषदेने सातवा क्रमांक तर पुण्याने अकराव्या क्रमांकावरून 10 क्रमांकावर झेप घेतली. परंतु पिंपरी-चिंचवड महापालिका 9 व्या क्रमांकावरून 43 व्या क्रमांकावर फेकली गेली. सध्या शासनाने प्लॅस्टिक बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरु केली आहे. त्यामुळे नागरिक रात्री उशिरापर्यंत प्लास्टिक पिशव्या कचराकुंडीत टाकतात.