पिंपरी-चिंचवड : प्रभागातील कचरा उचलला जात नसल्याच्या निषेधार्थ पालिकेच्या प्रवेशव्दारावर कचरा टाकून आंदोलन करणा-या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकेच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरसेविका पौर्णिमा रवींद्र सोनवणे (वय 42, रा. रूपीनगर), त्यांचे पती रवींद्र आप्पा सोनवणे (वय 46) यांच्यासह 20 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महापालिकेचे सहायक सुरक्षा अधिकारी विलास बाबासाहेब वाबळे (वय 55) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दरम्यान, सोनवणे म्हणाल्या, सत्ताधारी पक्ष विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. जनतेच्या हितासाठी दहा गुन्हे दाखल झाले तरी त्याला आपण घाबरत नाही
कार्यकर्त्यांनी घातला होता गोंधळ
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नगरसेविका सोनवणे व त्यांच्या 15 ते 20 कार्यकर्त्यांनी शुक्रवारी कोणतीही परवानगी न घेता पालिकेच्या प्रवेशव्दारावर कचरा टाकत गोंधळ घातला. यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. तसेच यामुळे पालिकेच्या दैनंदिन कामकाजात अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
कचरा उठाव नसल्याने राग
सोनवणे या प्रभाग क्रमांक 12 रुपीनगर, त्रिवेणीनगरमधून निवडून आल्या आहेत. या परिसरातील आणि सोसाट्यांमधील कचरा गेल्या काही दिवसांपासून उचलला जात नव्हता. परिसरात जागो-जागी कचर्याचे ढीगच्या-ढीग तर सोसाट्यांमध्ये देखील कचर्याचे ढीग साचले होते. सर्वत्र कचर्याच्या ढिगांमुळे दुर्गंधी पसरली होती. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने संतप्त झालेल्या नगरसेविका सोनवणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांने पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर कचरा टाकला होता.