इसिए विभागप्रमुख सानप यांचे कर्तृत्व
सांगवी : पिंपरी-चिंचवड परिसरामध्ये इकडे तिकडे रस्त्यावर, ओसाड ठिकाणी अजुनही कचरा टाकला जात आहे. महापालिका वारंवार कचरा रस्त्यावर टाकू नये म्हणून जनजागृती करताना दिसून येत आहे. मात्र त्याचा उपयोग होताना दिसून आहे. बाहेरील लोक येऊन उघड्यावर कचरा टाकून जातात. अनेकदा त्यांना कोणी रोख-ठोक करीत नाही. मात्र एका जागरूक नागरिकाने नुकताच एका महिलेला उघड्यावर कचरा टाकू नये म्हणून समज दिली. तसेच त्या महिलेला कचरा कुंडीतच कचरा टाकण्यासाठी प्रवृत्त करून त्या महिलेला कचरा कुंडीपर्यंत घेऊन गेले. हे जागरूक नागरिक म्हणजे इसिएचे ड क्षेत्रीय कार्यालय विभागाचे प्रमुख गोरक्षनाथ सानप आहेत. यांच्यासारखा जागरूकपणा प्रत्येक नागरिकाने दाखविल्यास शहर स्वच्छ राहण्यास नक्कीच मदत होईल. तसेच महापालिकेच्यावतीने करण्यात येणार्या जनजागृतीला यश आले असे म्हणता येईल.
परिसरातील प्लास्टिक गोळा करतात
इसिए अध्यक्ष विकास पाटील यांनी सांगितले की, गोरक्षनाथ सानप यांनी 13 सप्टेंबर रोजी पुणे शहरातून एक सुखवस्तू घरातील महिला इथे औंधला नातेवाईकांना भेटायला आली होती. येताना स्वतःच्या दुचाकीवर घरातील सर्व कचरा एका पोत्यात भरून घेऊन आली. औंधचा जुना पूल पार करुन आल्यावर रस्त्याच्या कडेला कचरा भरलेले पोते टाकले. पोते टाकून निघणार तेव्हा सानप यांनी तिला हटकले. कचरा न टाकण्याबाबत तिला समजावले. तसेच त्या बाईला कचरा पुन्हा कचरा कुंडीतच टाकण्यासाठी भाग पाडले. हे मोठे काम सानप यांनी केले आहे. स्वतःचे पेट्रोल व वेळ खर्च करून सानप रोज पहारा देत असतात. त्यांचा या कार्यासाठी गौरव होणे गरजेचे आहे. प्रत्येक नागरिकाने स्वतःची जबाबदारी ओळखून दक्ष राहिलो तरी मोठी बाब आहे. सानप त्यांच्या कुटुंबियांसमवेत दर रविवारी त्यांच्या परिसरातील रस्त्याच्या बाजूला पडलेले प्लास्टिक जमा करतात. आजपर्यंत मनपा ड क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य विभागाला सोबत घेऊन अनेकठिकाणी दंड वसुलीसुद्धा केली आहे.