पिंपरी-चिंचवड : शहरातील रस्ते व परिसराची स्वच्छता योग्य पद्धतीने करण्याचे नियोजन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. त्यासाठी पाहणी दौरा करण्यात येणार आहे. त्यामध्ये कचरा विषयक कामांमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधित मुकादम व आरोग्य निरीक्षकांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला आहे. शहरातील आरोग्य विषयक कामकाजाचा आढावा घेण्यासाठी सोमवारी महापालिकेत बैठक पार पडली. या बैठकीत आयुक्त हर्डीकर बोलत होते.
यांची होती उपस्थिती
या बैठकीला उपमहापौर शैलजा मोरे, सभागृह नेते एकनाथ पवार, नगरसेवक नामदेव ढाके, नगरसेविका शर्मिला बाबर, सह आयुक्त दिलीप गावडे, उपसंचालक नगररचना प्रशांत ठाकूर, सह शहर अभियंता प्रवीण तुपे, आरोग्य अधिकारी विजय खोराटे, सहायक आयुक्त आशादेवी दुरगुडे, संदीप खोत, अण्णा बोदडे, सीताराम बहुरे, मनोज लोणकर, पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी आदी उपस्थित होते.
कचरा वेळोवेळी उचलावा
शहरातील कचरा वेळोवेळी उचलला जाईल, याची संबंधित अधिकार्यांनी काळजी घ्यावी. तसेच नव्या ट्रान्सफर स्टेशनची जागा लवकरात लवकर निश्चित करावी, कचरा गाड्यांचे ब्रेकडाऊन कमी करण्यासाठी योग्य नियोजन करण्याबाबतचे निर्देश आयुक्त हर्डीकर यांनी संबंधित अधिकार्यांना दिले आहेत. यावेळी सभागृह नेते एकनाथ पवार म्हणाले की, शहरातील कचरा वेळच्या वेळी उचलला गेला पाहिजे. मात्र, तसे होत नाही. त्यामुळेच शहरात ठिकठिकाणी कचर्याचे ढिग आढळून येत आहेत. कचरा गाड्या नादुरुस्त होण्याचेदेखील प्रमाण खूप आहे. त्यावर योग्य ती उपाययोजना केली पाहिज. प्रत्येक प्रभाग एक ट्रान्सफर स्टेशन असले पाहिजे. जेणेकरून कचरा वाहतुकीची समस्या कमी होईल, असे त्यांनी सांगितले.