मुंबई । मुंबई महापालिकेच्या आदेशानंतरही कचरा विल्हेवाट लावण्याकडे अनेक सोसायट्यांनी दुर्लक्ष केले आहे. दुर्लक्ष करणार्या सोसायट्यांवर मनपा आता ’स्ट्राँग एक्शन’ घेणार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून थंडावलेली ही कारवाई आता 1 फेब्रुवारीपासून पुन्हा सुरू होणार आहे. पालिकेने दिलेल्या निर्देशानुसार 20 हजार चौ.मीटरपेक्षा जास्त आकाराच्या आणि 100 किलोंपेक्षा जास्त कचरा निर्माण होणार्या सोसायट्यांना कचर्याच्या विल्हेवाटीची व्यवस्था करण्यासाठी 31 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, ही मुदत संपून महिना झाला तरी अनेक सोसायट्यांनी पालिकेचा आदेश धाब्यावर बसवला आहे. असे असतानाही पालिकेच्या संबंधित अधिकार्यांकडून कारवाई झाली नसल्यामुळे पालिका आयुक्तांनी अधिकार्यांची चांगलीच कानउघाडणी केली व तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले.
2596 सोसायट्या कचरा व्यवस्थापन करत नसल्याचे आले आढळून
या कानउघाडणीनंतर अधिकारी कामाला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर 1 फेब्रुवारीपासून कचरा वर्गीकरणाबाबत दुर्लक्ष करणार्या सोसायट्यांवर कठोर कारवाई होणार आहे. पालिका कार्यक्षेत्रातील एकूण 3335 सोसायट्यांपैकी 2596 सोसायट्या कचरा व्यवस्थापन करत नसल्याचे आढळले. यानुसार तब्बल 3308 सोसायट्यांना ’एमएमसी’ अॅक्टनुसार नोटीस पाठवण्यात आली. मात्र, आतापर्यंत यातील फक्त 196 सोसायट्यांवर कारवाई झाली आहे. यातील 680 सोसायट्यांनी नोटीसनुसार कार्यवाही केली. तर 1242 सोसायट्यांनी मुदत वाढवून मागितली आहे.
पालिका आक्रमक होणार
पालिकेने 162 सोसायट्यांना ’एमआरटीपी’ कायद्यानुसार नोटीस पाठवली होती. या कायद्यानुसार कचरा विल्हेवाटीच्या जागेचा गैरवापर झाल्याचे आढळल्यास पोलीस कारवाई होणार आहे. यातील 34 सोसायट्यांनी कार्यवाही केली असून, 13 सोसायट्यांनी कार्यवाहीसाठी वेळ वाढवून मागितली आहे. तर 6 सोसायट्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण कायद्यानुसार आतापर्यंत 235 सोसायट्यांना कचरा विल्हेवाट करण्याचे निर्देश देण्यात आले. यातील 46 सोसायट्यांनी नोटिसीनुसार कार्यवाही सुरू केली असून, 22 सोसायट्यांनी यासाठी वेळ वाढवून मागितली आहे.