नवी मुंबई । नवी मुंबई महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याच्या सक्तीनंतर आता पुन्हा आयुक्त एन.रामास्वामी सुद्धा याच मुद्यावर आक्रमक झाले आहेत. अनेक वेळा नोटीस बजावूनही ओला आणि सुका कचरा वेगळा न करणार्या सोसायट्यांच्या पाण्यासारख्या अत्यावश्यक सेवा यापुढे खंडित करण्यात येणार आहेत. स्वच्छ शहरासाठी वर्गिकरण सक्तीचे करण्यात आले आहे.
प्रशासनाच्या नोटीसा जारी
नवी मुंबई पालिका क्षेत्रात रोज 600 मेट्रीक टन घनकचरा तयार होता. त्याची विल्हेवाट तुर्भे येथील कचराभूमीवर लावली जाते. केंद्र सरकारच्या घनकचरा व्यवस्थापन प्रणालीत घरगुती कचर्यात ओला व सुका वेगळा करणे बंधनकारक करण्यात आले आहे. नवी मुंबई पालिकेने काही दिवसांपूर्वी 500 पेक्षा जास्त सोसायट्यांना ओला व सुका कचरा वर्गीकरणासंदर्भात नोटिसा जारी केल्या होत्या. माजी पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तर कचरा वेगळा न करणार्या सोसायट्यांचा कचरा न उचलण्याचे आदेश दिले होते.
पाणीपुरवठा खंडीत करण्याचा इशारा
अनेक सोसायट्यांबाहेर कचर्याचे ढिग जमा झाल्याने रहिवाशांत नाराजी पसरली होती. त्यानंतर काही कचरा वर्गीकरणास सुरुवात केली. तरीही शेकडो सोसायट्यांतील रहिवासी आजही सुका व ओला कचरा एकत्रच टाकत आहेत. त्यामुळेच नोटीस देऊनही नियम न पाळणार्या सोसायट्यांचा पाणी पुरवठा खंडीत करण्याचे पाऊल उचलण्याचा इशारा पालिकेच्या वतीने देण्यात आला आहे.माजी पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तर कचरा वेगळा न करणार्या सोसायट्यांचा कचरा न उचलण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर अनेक सोसायट्यांनी कचरा उचलून परिसरात स्वच्छता ठेवली होती.
नवी मुंबई पालिका क्षेत्रात 500 पेक्षा जास्त सोसायट्यांना ओला व सुका कचरा वेगळा करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यानंतर अनेक सोसायट्यांनी अमंलबजावणी सुरू केली आहे. काही सोसायट्यांनी अनेकदा सांगूनही त्यांच्या कारभारात सुधारणा केलेली नाही. त्यामुळे एमआरटीपी कायद्यानुसार या सोसायट्यांवर कारवाई केली जाणार आहे.
– तुषार पवार, उपायुक्त, नवी मुंबई पालिका