कचरा वेचक कर्मचार्‍यांचे निगडीत आंदोलन

0

पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या ’अ’ व ’फ’ क्षेत्रिय कार्यालय परिसरातील घरोघरचा कचरा संकलित करणार्‍या कचरा वेचक कर्मचार्‍यांना जून महिन्याचे वेतन अद्यापही मिळालेले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या कचरा वेचक कर्मचारी व कचरा गाडीवरील वाहनचालकांनी मंगळवारी आकुर्डीतील हेडगेवार भवनासमोर आंदोलन करत महापालिका प्रशासनाचा निषेध नोंदविला. दरम्यान, या आंदोलनानंतर जागे झालेल्या प्रशासनाने कर्मचार्‍यांच्या वेतनप्रश्‍नी ठोस भूमिका घेत दुपारपर्यंत कर्मचार्‍यांचे वेतन अदा करण्यास सहमती दर्शविली.

दोन दिवसांपासून काम बंद
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ’अ’ व ’फ’ क्षेत्रिय कार्यालय परिसरातील घरोघरचा कचरा संकलित करणार्‍या कचरा वेचक कर्मचार्‍यांचे जून महिन्याचे वेतन अद्यापही झालेले नाही. त्याच्या निषेधार्थ कचरा वेचक कर्मचारी व कचरा गाडीवरील वाहनचालकांनी दोन दिवसांपासून काम बंद केले होते. त्यामुळे दोन दिवसांपासून ’अ’ व ’फ’ क्षेत्रिय कार्यालय परिसरातील घरोघरचा कचरा उचलला गेला नाही. वेळोवेळी वेतनाची मागणी करुनही महापालिका प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने कर्मचार्‍यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले.

आंदोलनाची दखल
याबाबत बोलताना ’अ’ क्षेत्रिय कार्यालयाच्या क्षेत्रिय अधिकारी आशा दुरगुडे म्हणाल्या की, ’अ’ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत 90 कचरा वेचक तसेच 52 वाहनचालक आहेत. मंगळवारी दुपारपर्यंत त्यांचे वेतन देण्यात येणार आहे. ’फ’ क्षेत्रिय कार्यालयाचे क्षेत्रिय अधिकारी मनोज लोणकर म्हणाले, ’फ’ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत कचरा उचलणार्‍या कर्मचा-यांचे जून महिन्याचे वेतन रखडले आहे. त्यामुळे काही वाहनचालकांनी काम बंद केले होते. त्यामुळे घरोघरचा कचरा उचलला गेला नाही. परंतु, सार्वजनिक ठिकाणी ठेवलेल्या कुंड्यांमधील कचरा उचलला गेला आहे. या कर्मचार्‍यांचे मंगळवारी दुपारपर्यंत वेतन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.