भुसावळ। सद्यस्थितीत देशात कचरा व्यवस्थापन हि एक ज्वलंत आणि भिषण समस्या उभी ठाकली आहे. ठिकठिकाणी कचर्याचे ढिग दृष्टीस पडत आहेत. यातून पर्यावरणाचा समतोलही ढासळत असून कचर्याचे योग्यरित्या व्यवस्थापन करणे हि काळाची गरज आहे. मात्र यासाठी शहरातील सर्व स्वयंसेवी संस्था जरी एकत्र आल्या तरी प्रभावी व्यवस्थापन होणे शक्य नाही, यासाठी प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच लोकप्रतिनिधी यांच्या एकत्रित सहकार्यानेच कचर्याची समस्या सुटू शकते. यासाठी सर्वसामान्य नागरिकांना स्वयंसेवी संस्थांनी यां शासकीय यंत्रणेवर दबाव टाकण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन पुणे येथील मनिषा दाते यांनी केले.
ओल्या कचर्यापासून खतनिर्मिती
यावेळी मार्गदर्शन करताना मनिषा दाते यांनी सांगितले की, आपल्याकडे ज्या कचर्याला विकून पैसे मिळतात त्याची कुठलीही जनजागृती न करता योग्यरित्या विल्हेवाट लावली जाते. मात्र ज्यापासून पैसे मिळत नाही तो कचरा रस्त्यावर फेकला जातो. यातूनच खरी समस्या निर्माण होत असते. त्यामुळे कचर्याची निसर्ग निर्मित व मानवनिर्मित अशी विभागणी करुन विल्हेवाट करण्याची आवश्यकता आहे. ओला कचरा हा नैसर्गिक तर सुका कचरा हा मानवनिर्मित कचर्यात येतो. ओल्या कचर्याची विल्हेवाट हि प्रत्येक नागरिक आपल्या घरातल्या घरात वैयक्तिक पातळीवर सहजरित्या करु शकतो, घरातील भाजीपाल्याच्या कचर्यास बागेतील कुंड्यांमध्ये टाकल्यास त्याचा खत म्हणून वापर होतो. मात्र सुक्या मानवनिर्मित कचर्याची विल्हेवाट करण्यासाठी यंत्रणेची आवश्यकता असते. याचा पुर्नवापर केल्यास समस्या सुटू असेही दाते यांनी सांगितले.
प्रात्यक्षिकाद्वारे करण्यात आले मार्गदर्शन
येथील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महिला शाखेतर्फे शनिवार 10 रोजी सहकार नगरातील आयएमए सभागृहात कचरा व्यवस्थापनावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यात पुणे येथील मनिषा दाते आणि विभावरी खानापूरकर यांनी ओला कचरा व कोरडा कचरा यांचे वर्गीकरण करुन त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. याप्रसंगी व्यासपीठावर आयएमएचे अध्यक्ष डॉ. दिपक जावळे, सचिव डॉ. मिलींद पाटील, आयएमए महिला शाखेच्या चेअरमन डॉ.अर्चना खानापूरकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आयएमए महिला शाखेच्या समन्वयक डॉ.निलीमा नेहेते यांनी केले.
नैसर्गिकता बाळगणे गरजेचे
शेतात रसायनांचा वारेमाप वापर होत आहे. यामुळे जमिनीची पोत ढासळत असून पावसाचे पाणी शोषून ठेवण्याची क्षमता घटत आहे. याचाच परिणाम पर्जन्यमानावर होऊन निसर्गचक्रात बदल होत असल्याचे दिसून येते. मात्र पिकांना रसायनिक खते न देता झाडांचाच पालापाचोळा एकत्र करुन त्यापासून निर्मित खत दिल्यास पिकांनी नैसर्गिकरित्या जोमाने वाढ होते. तसेच जमिनीची पाणी धरुन ठेवण्याची क्षमता विकसीत होऊन बाष्पीभवनाद्वारे पर्जन्यमान सुधारते. त्यामुळे आपण जितकी जास्तीत जास्त नैसर्गिकता बाळगू तितके निसर्गासाठी व पर्यायाने आपल्यासाठी हितकारक ठरेल असे मनिषा दाते यांनी स्पष्ट केले.
दीर्घकाळ टिकणार्या वस्तूंचा वापर करा
देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान हे एक जनआंदोलन सुरु केले आहे. कचर्यापासून खत व उर्जा निर्मिर्ती करणे गरजेचे आहे. कचरा जाळल्यामुळे प्रदुषण होते. त्यामुळे निसर्गाने दिलेले त्याला परत करा, तर मानवाने दिलेले मानवाला परत करा, म्हणजेच नैसर्गिक कचर्याचा खत म्हणून वापर करा तर प्लास्टीकपासून विविध वस्तू तसेच इंधनाच्या स्वरुपात पुर्नवापर करण्याची आवश्यकता असल्याचे विभावरी खानापूरकर यांनी सांगितले. तसेच प्लास्टीक वस्तूंपेक्षा दिर्घकाळ टिकणार्या वस्तूंचा वापर करावा जसे कापडी पिशव्या स्टीलची भांडी आदी वस्तूंमुळे कचर्याची समस्या बर्याच प्रमाणात कमी होऊ शकेल असेही खानापूरकर यांनी सांगितले.