विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचा आरोप
पिंपरी : कचरा संकलन आणि वाहतूक कामासाठी येणार्या 570 कोटींच्या कामास उपसूचनेद्वारे न वाचताच सत्ताधार्यांनी त्यास प्रशासकीय मान्यता घेतली आहे. त्यामध्ये काळेबेरे असल्यानेच भाजपच्या मोजक्या नगरसेवकांनी घाईत अवलोकनाच्या विषयाला उपसूचना देऊन मंजूर करुन घेतल्याचा आरोप, विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला. तसेच अवलोकनाच्या विषयाला उपसूचना देता येत नाही. सत्ताधारी नियमांचे उल्लंघन करत आहेत असा आरोप करत प्रशासकीय मान्यतेचा विषय रितसर विषयपत्रिकेवर आणण्याची मागणी त्यांनी केली. गुरुवारी झालेल्या महासभेत उपसूचनेद्वारे आयत्यावेळी प्रशासकीय मान्यता घेतली. दरम्यान, तब्बल 570 कोटी रुपयांच्या कामाला उपसूचेद्वारे आयत्यावेळी मान्यता देत असताना विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी त्यावर चर्चा केली नाही. त्यामुळे विरोधकांच्या भूमिकेबाबत पालिका वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरु आहेत.
हे देखील वाचा
कचर्याचा विषय गंभीर
याबाबत बोलताना विरोधी पक्षनेते दत्ता साने म्हणाले की, सत्ताधार्यांनी न वाचताच अवलोकनाच्या विषयाला उपसूचना देऊन कचरा संकलनाच्या तब्बल 570 कोटींच्या कामाला प्रशासकीय मान्यता घेतली आहे. यामध्ये काळेबेरे असल्यानेच भाजपच्या चार ते पाच नगरसेवकांनी उपसूचना मंजूर करुन घेतली आहे. कचर्याचा संवेदनशील व गंभीर विषय आहे. यावर साधक बाधक चर्चा होण्याची आवश्यकता आहे. सुमारे 570 कोटीचा प्रशासकीय मान्यतेचा विषय रितसर प्रशासनाकडून येणे अपेक्षित होते. तो घाई घाईने मंजूर केला आहे. या विषयाची उपसूचना वाचली गेली नाही. त्यामुळे ही उपसूचना नेमकी काय होती याचा उलगडा झाला नाही. विषयपत्रिकेवरील 19 व्या क्रमांकाचा विषय हा अवलोकनाचा होता. त्यामुळे तांत्रिकदृष्टया या विषयाला उपसूचना देता येत नाही. त्यामुळे यामध्ये नियमाचे उल्लंघन झाले आहे. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे.