पिंपरी-चिंचवड : कचरा व्यवस्थापनाच्या निविदा प्रक्रियेतील त्रुटी दूर करून नवीन निविदा प्रक्रिया राबवण्याचे काम सुरू आहे. ही निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. येत्या तीन महिन्यात शहरातील कचरा समस्या आणि आरोग्य प्रश्न सोडवण्यात यश येईल, असा विश्वास महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
त्रुटी दूर करण्याचे काम सुरू
आयुक्त श्रावण हर्डीकर पुढे म्हणाले की, कचरा व आरोग्याच्या अनेक तक्रारी आहेत. सध्या प्रभागनिहाय मनुष्यबळ कमी आहे. तसेच, कचरा संकलित करणार्या गाड्यांची संख्यादेखील कमतरता आहे. यापूर्वी कचरा उचलण्याची निविदा प्रक्रिया तसेच, कामातही अनेक त्रुटी होत्या. त्या त्रुटी दूर करून नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याचे काम सुरू झाले आहे. शहरातील कचरा प्रश्न कायमस्वरुपी निकाली काढण्यासाठी दीर्घकालीन उपाय-योजना करण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले आहे. नवीन निविदा प्रक्रिया होऊन येत्या तीन महिन्यांत हा प्रश्न निश्चित सुटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.