सभागृह नेते एकनाथ पवार यांचा सवाल
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने कचरा संकलन व कचरा वहन कामासाठी काढलेली निविदा रद्द केली आहे. आणखीन कमी दर व्हावा, यासाठीच भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सूचनेनुसार निविदा रद्द करण्यात आली आहे. कचर्याची निविदा रद्द केली असल्यामुळे मग भ्रष्टाचार झाला कुठे, असा प्रतिप्रश्न सभागृह नेते एकनाथ पवार यांनी विरोधी पक्षनेत्याला केला आहे. नवनियुक्त राष्ट्रवादीचे विरोधी पक्षाचे दत्ता साने यांनी निविदा काढण्याच्या मुद्यावरून आरोप केले होते. त्या आरोपांना उत्तर देताना एकनाथ पवार बोलत होते.
भाजपला वर्षभरात मुलभूत प्रश्न सोडविता आले नाहीत. कचरा, पाण्याचे प्रश्न प्रलंबित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना पिंपरी महापालिकेला स्वच्छतेचा ‘बेस्ट’ पुरस्कार मिळाला होता. त्यावेळी कचरा संकलनाचे काम करणारी यंत्रणा आजही काम करत आहे. तरीही, शहरात कचर्याची समस्या उग्र झाली आहे. दररोज कचरा उचलला जात नाही. सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी कचर्यात गुरफुटले आहेत. पैसे खाण्यासाठी त्यांना कचरा देखील पुरला नाही. कचर्याच्या किती निविदा काढाव्यात. किती नाही, हेच त्यांना समजेना झाले आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी भाजपवर केला होता.
भाजपचे काटकसरीचे धोरण
साने यांच्या आरोपांना उत्तर देताना सभागृह नेते एकनाथ पवार म्हणाले की, कचर्याची निविदा रद्द केली आहे. त्यामुळे भ्रष्टाचार झाल्याचा प्रश्नच नाही. भाजपने काटकसरीचे धोरण अवलंबविले असून काटकसर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपने अनेक उपक्रमांमध्ये बदल केले आहेत. त्यामुळे महापालिकेचा पैसा वाचविणे सोपे जाणार आहे. महापालिकेचा पैसा म्हणजे तो पिंपरी-चिंचवडकरांच्या कष्टाचा पैसा आहे.