कचर्‍यातून पैसे…राष्ट्रवादीचा आरोप बिनबुडाचा

0

महापौर, सभागृह नेत्यांचे प्रत्त्युत्तर

पिंपरी-चिंचवड : शहरातील घरोघरचा कचरा गोळा करुन तो मोशी कचरा डेपो येथे नेण्याच्या नव्या कंत्राटात 252 कोटी रुपयांचा घोटाळा होणार असल्याचा आरोप बिनबुडाचे आहे. शवदाहिनीत भ्रष्टाचार करणार्‍यांनी बोलू नये, असे प्रत्युत्तर महापौर नितीन काळजे व सभागृह नेते एकनाथ पवार यांनी राष्ट्रवादीला दिले आहे.याबाबत गुरूवारी राष्ट्रवादीने भाजपवर हल्लाबोल करताना शहराच्या दोन भागाची विभागणी करुन भाजपचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधींना लोकसभा, विधानसभा निवडणुकीचा खर्च काढायचा आहे. भाजपवाले ’अँनाकोंडा’ असून पैसे गिळून टाकत आहेत, असा आरोप केला होता. त्याला महापौर व सभागृह नेत्यांनी पत्रकार परिषेद घेऊन प्रत्युत्तर दिले आहे.

‘बीव्हीजी’ राष्ट्रवादीची पिलावळ
कचरा संकलन वहनाबाबत केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. राष्ट्रवादी पराभवाच्या गर्तेतून बाहेर आली नाही. त्यांना आत्मपरीक्षणाची गरज आहे. आम्ही राष्ट्रवादीची अनेक प्रकरणे उघडकीस आणू शकतो. बीव्हीजी ही ठेकेदार संस्था राष्ट्रवादीची पिलावळ आहे. बीव्हीजीला राष्ट्रवादीने पालिकेला आंदण दिले आहे. पालिकेच्या सर्वंच विभागातील कामे बीव्हीजीला दिली आहेत. या कामाबाबत महापालिका आयुक्त सविस्तर खुलासा करतील. राष्ट्रवादीने भाजपची बदनामी थांबवावी. अन्यथा राष्ट्रवादीची प्रकरणे बाहेर काढली जातील, असा इशाराच महापौर काळजे आणि सभागृह नेते पवार यांनी दिला आहे.