कचर्‍याबाबत आंदोलनाचा इशारा

0

येरवडा । विश्रांतवाडी परिसरातील शांतीनगर परिसरात राजकीय नेत्यांच्या व पालिका अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर बनल्याने याविरोधात मनसेने आक्रमक पवित्रा घेतला असून यावर त्वरित उपाययोजना न झाल्यास पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राहुल छजलानी व निलेश कांबळे यांनी दिला आहे.

कर्मचारी वेळेवर कचरा उचलत नाही
नागरिकांना विविध सुविधांबरोबरच कचर्‍याचा प्रश्‍न मार्गी लागावा या उद्देशाने कचराकुंडी ठेवण्यात आल्या असून अनेक ठिकाणी कचरा जमा करण्यासाठी ठेकेदार पद्धतीवर कामगारांची भरती पालिकेच्या वतीने करण्यात आली असली तरी पण शांतीनगर भागात याचा मोठ्या प्रमाणावर अभाव दिसून येत आहे. कर्मचारी वेळेवर कचरा उचलण्यासाठी येत नसल्याने या भागातील नागरिकांना असलेला कचरा नाइलाजास्तव रस्त्यालगतच टाकण्याची वेळ येत असल्याने परिसरात कचर्‍याचे मोठमोठे ढीग साचले आहेत. त्यामुळे डासांचे प्रमाणही वाढले आहे. दुसरीकडे यामुळे मोकाट जनावरांचा वावर वाढल्याने जनावरांच्या त्रासामुळे परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत.

डीपीजवळच कचर्‍याचे ढीग
परिसरातून पादचारी नागरिकांना जाताना कचर्‍याच्या साम्राज्यासह दुर्गंधीचा सामना करण्याची वेळ येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. यामुळे परिसरात डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजाराची साथ पसरते की काय? अशी धास्ती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यातच टाकण्यात येणारा कचरा हा एका विद्युत डीपी व रोहित्राजवळच टाकण्यात येत असल्याने एखाद्या दिवशी शॉर्टसर्कीटमुळे काही जीवितहानी झाली तर यास जबाबदार कोण? असा संतप्त सवाल छजलानी यांनी केला असून कचरा समस्यांबाबत अनेकदा परिसरातील नागरिकांनी स्थानिक लोकप्रतिनिधी व पालिका अधिकार्‍यांकडे तक्रार करूनही राजकीय नेत्यांसह अधिकार्‍यांनी देखील जनतेच्या समस्येला केराची टोपली दाखवली असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

क्षेत्रिय कार्यालयात कचरा टाकू…
यापूर्वी उपनगरात पदपथांसह रस्त्यांवर अतिक्रमण करणार्‍या पथारी व्यावसायिकांच्या विरोधात संपूर्ण राज्यात मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आली होती. आता त्याच स्टाइलने जर झोपी गेलेल्या पालिका अधिकारी व राजकीय नेत्यांना जनतेच्या कामांचा व प्रश्‍न सोडविण्याचा विसर पडला असेल तर पालिका क्षेत्रिय कार्यालयात अधिकार्‍यांच्या कार्यालयातच कचरा टाकू आंदोलन करू असा इशारा छजलानी यांनी दिला असून शांतीनगरसह इंदिरानगर भागातील कचर्‍याच्या समस्या त्वरित सोडविण्याची मागणी छजलानी व कांबळे यांनी केला आहे.