टेक्सास : कोरोनामुळे जगभरातील अर्थव्यवस्था संकटात आली असताना आज कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाचा भाव इतिहासात पहिल्यांदाच शून्याखाली गेला आहे. मंगळवारी वेस्ट टेक्सास क्रूडचा भाव मंगळवारी मायनस ३७.६३ डॉलर प्रती बॅरल इतका खाली कोसळला. खनिज तेलाची साठवणूक करणे जिकरीचे बनल्याने विक्रेत्यांनी खरेदीदारांना प्रती बॅरल ३७.६३ डॉलर दिले. अचानक तेलाचा भाव शून्यखाली कोसळल्याने अमेरिका, रशियासह आखाती देशांमधील खनिज तेल उत्पादक देशांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
करोना रोखण्यासाठी जवळपास निम्मे देशांत अघोषित टाळेबंदी आहे. अशा स्थितीत वाहतूक व्यवस्था, उद्योग धंदे ठप्प आहेत. परिणामी खनिज तेलाच्या मागणीत प्रचंड घट झाली आहे. दरम्यान, क्रूडचा भाव काही प्रमाणात सावरला आहे. उणे पातळीवर तो आता २०.४३ डॉलर प्रती बॅरलपर्यंत गेला. दरम्यान तेलाच्या किमतींनी प्रत्यक्षात तळ गाठल्याने खनिज तेल उत्पादक देशांची अक्षरश: गाळण उडाली आहे. तेलाच्या किमती शून्याखाली कशा गेल्या याबाबत तेल उत्पादक देशांची संघटना ओपेककडून माहिती घेण्यात येणार आहे. अमेरिकी बाजारपेठे खनिज तेलाचा मोठ्या प्रमाणात पुरवठा झाला आहे. त्यामुळे तेलाची साठवण करण्याचे आव्हान यंत्रणेसमोर आहे.