उल्हासनगर: मनपाच्या अंतर्गत कोनार्क कंपनीच्या कच-याच्या गाडीवरील चालकाला स्वीफट् गाडीचालकाने भर रस्त्यात थांबवून चापटयाने मारहाण केल्याची घटना हिललाईन पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. कच-याच्या गाडीवरील कर्मचा-यांना वारंवार मारहाण करण्यात येत असल्याने कर्मचा-यांनी या घटनेचा निषेध करीत चालकाला मारहाण करणा-याचा पोलिसांनी शोध घेऊन त्याला अटक करावी अशी मागणी केली.
मारहाण झालेल्या चालकाचे नाव चंद्रकांत बनसोडे(२३) आहे. तो मनपा अंतर्गत कोनार्क कंपनीच्या कच-याच्या गाडीवर चालक म्हणून काम करतो. सोमवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास कॅम्प नं. ५ येथिल गायकवाडपाडा परिसरात असणा-या डम्पिंग ग्राउंडवर तो कच-याची गाडी घेऊन चालला होता. त्यावेळी आकाश कॉलेनी वॉटर स्पलायजवळ स्वीफट् गाडीचालकाने हार्न वाजवला. चंद्रकांत याने गाडी थांबवली असता स्वीफट् गाडीतून चालकाने खाली उतरून तुला हॉर्नचा आवाज येत नाही का? गाडी बाजुला घे। असे बोलत त्याला चापटीने मारहाण करून शिवीगाळ केली. या घटनेची माहिती डम्पिंग ग्राउंडवरील मुकादम व कर्मचा-यांना मिळताच त्यांनी हिललाईन पोलिस ठाणे गाठले. याप्रकरणी हिललाईन पोलिस ठाण्यात स्वीफट् गाडीचालक याच्याविरूध्द तक्रार दाखल करण्यात आली असून गाडी नंबर देखिल पोलिसांना देण्यात आला आहे. चालकाला मारहाण झाल्याप्रकरणी कर्मचा-यांना या घटनेचा निषेध व्यक्त केला. १५ दिवसापुर्वी एका कर्मचा-याला देखिल मारहाण झाली होती. डम्पिग ग्राउंड येथे कचरा टाकण्यासाठी जाणा-या वाहनचालकांना होत असलेल्या मारहाणीमुळे कर्मचारी वर्ग संतप्त झाले आहेत.