‘कटऑफ’पेक्षा जास्त गुण असूनही एमपीएससीने डावलले!

0

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या एसटीआयच्या परीक्षेत खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांचा कटऑफ 119 लागला होता. या परीक्षेत अंजली केंद्रे, संगिता चौधरी, श्वेता खाडे, अनिता बांगर, स्वाती मिसाळ, नीलेश कापकर, सतीश बडे आदी विद्यार्थ्यांना कटऑफपेक्षा जास्त गुण असूनही आयोगाने एसटीआयपदी निवड केली नाही. केवळ याच नव्हे तर यांसारखे अनेक विद्यार्थी कटऑफपेक्षा जास्त गुण प्राप्त असले तरी त्यांची निवड करण्यात आलेली नाही. या विद्यार्थ्यांनी खुल्या प्रवर्गातून अर्ज केला व शुल्कही खुल्या प्रवर्गातून भरले; शिवाय मागासवर्गीयांची कोणतीही सवलत घेतली नसतांना तुम्ही मागासवर्गीय आहात म्हणून तुमची निवड खुल्या प्रवर्गातून करता येत नाही, असे आयोगाने ईमेलद्वारे या विद्यार्थ्यांना कळविले आहे. त्यामुळे आयोगाने या परीक्षार्थ्यांच्या भवितव्याशी क्रूर खेळला असल्याची बाब निदर्शनास आली आहे.

लाखो महिला उमेदवारांना फटका
एमपीएससीमार्फत घेतलेल्या परीक्षांच्या निकालामध्ये पूर्व, मुख्य आणि अंतिम अशा तीनही स्तरावर मागास प्रवर्गातील महिला परीक्षार्थ्यांचे पात्रता गुण हे खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांच्या पात्रता गुणांपेक्षा अधिक आहेत. असे असले तरीही महाराष्ट्रातील सामाजिक आरक्षणाचा लाभ मिळविणार्‍या लाखो महिला उमेदवारांना फटका बसतो आहे. महाराष्ट्र शासनाच्या 13 ऑगस्टच्या परिपत्रकानुसार खुल्या प्रवर्गातून समांतर आरक्षणाची पदे भरतांना गुणवत्तेच्या निकषानुसार खुल्या प्रवर्गातील उमेदवारांची निवड यादी करावी. तसेच खुल्या प्रवर्गातील गुणवत्तेच्या आधारावर मागासवर्गीय उमेदवारांचाही समावेश होईल असा उल्लेख आहे. असे असतांना आपण मागासवर्गीय वर्गातील असल्याने आपला विचार अमागास (खुल्या) महिला वर्गवारीसाठी करता येत नाही. त्यामुळे आपणास निकाल प्रक्रियेतून वगळण्यात आले आहे. अशा स्वरूपाचे ईमेल आयोगामार्फत उमेदवारांना पाठविण्यात आले आहेत.

काय आहेत परीक्षार्थ्यांच्या मागण्या?
* समांतर आरक्षणासाठी 13 ऑगस्टरोजी काढलेल्या परिपत्रकाची चुकीची अंमलबजावणी एमपीएससीने थांबवावी. ही चुकीची अंमलबजावणी करू नये म्हणून राज्य शासनाने स्पष्ट निर्देश द्यावेत.
* आयोगाचे अध्यक्ष यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा राज्य शासनाने त्यांची निवड रद्द करावी.
* समांतर आरक्षणाच्या 2014 च्या परिपत्रकामुळे आजपर्यंत ज्या मागसवर्गीय महिलांना, खेळाडूंना मुख्य परीक्षा देण्याची संधी मिळाली नाही, त्या सर्व महिलांना, खेळाडूंना मुख्य परीक्षा देण्याची संधी द्यावी.
* एमपीएससीने विद्यार्थ्याचे नाव, पत्ता व जात कोणालाच पहाता येणार नाही याची खबरदारी घ्यावी. तसेच विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन प्रोफाइलमध्ये जो आयोगाकडून हेतुपुरस्सर बदल करणे चालू केले आहे, ते पूर्णतः बंद करावे.
* एमपीएससीने विद्यार्थ्याचे प्रोफाइल गोठवले आहेत, ते पुन्हा पूर्ववत करावेत, आणि अर्ज करताना विद्यार्थ्यांना त्याच्या प्रवर्गातून किंवा खुला प्रवर्गातून अर्ज करु द्यावे.
* ऑनलाईनअर्ज करतांना खुल्या प्रवर्गाचीची जागा हवी का? असे न विचारता जो मागासवर्गीय मुलगा, मुलगी गुणवत्तेने पात्र असेल त्याला खुल्या प्रवर्गाचे पद द्यावे. त्यात ओपन फीमेलची जागा सुद्धा मागासवर्गीय मुलगी गुणवत्तेने पात्र असेल, तर तिला खुल्या प्रवर्गातील महिलेचे पद द्यावे.
* सरळ सेवा भरतीतील मुलाखतीच्या कटऑफची अट रद्द करावी. त्या आधारे मागासवर्गीय उमेदवारावर अन्याय केला जाऊ शकतो.
* सर्व विभागाच्या आधिकारी अणि कर्मचार्‍यांची सर्व माहिती ऑनलाइन प्रसिद्ध करावी, त्यात रुजू झाल्याची तारीख , जन्मतारीख, जात, पोटजात, सेवाज्येष्ठता, पोस्टिंग आदी नमूद करावे.