कटप्पा नि बाहुबलीचा खेळ!

0

स्वातंत्र्यानंतर एक देश आणि एक करप्रणाली म्हणजेच महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अर्थात जीएसटीवर आता महाराष्ट्रानेही शिक्कामोर्तब केले. त्यासाठी विधीमंडळाचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन नुकतेच पार पडले. जीएसटी विधेयक मंजूर होणार यात दुमत नव्हतेच. जीएसटीमुळे आशिया खंडातील सर्वात मोठी महापालिका ओळखली जाणार्‍या मुंबई महापालिकेतील सुमारे सात हजार कोटी रुपयांचे नुकसान होणार असल्याने सुरुवातीला शिवसेनेने विरोधाची भूमिका घेतली होती. पण मुंबई महापालिकेच्या तिजेारीत उत्पन्न मिळण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्यात आल्याने शिवसेनेचा विरोध मवाळला. शिवसेनेची ही पहिली वेळ नाही अनेक वेळा सेनेने तलावर उपसरली आणि म्यानही केली आहे. मुंबई महापालिका हा शिवसेनेचा प्राण आहे. देशात आणि राज्यात ज्या काही निवडणुकांचे निकाल लागले त्यात भाजपचे कमळ फुललं. अशावेळी मोदी लाटेत मुंबईने शिवसेनेला साथ दिली. त्यामुळे मुंबईसाठी शिवसेना एकवेळ राज्याच्या सत्तेलाही लात मारू शकते हे तितकचं सत्य आहे. असो, विधीमंडळ अधिवेशनात जीएसटीपेक्षा राजकीय चिमटे काढणारी भाषणेच अधिक रंगली. कटप्पाने बाहुबली को क्यूं मारा? असा प्रश्‍न राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी उपस्थित करीत, भाजप नेते एकनाथ खडसे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील शह-काटशहच्या राजकारणावर बोट ठेवलं. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्मिक उत्तर देताना बाहुबली पार्ट 2 दाखवण्याची तयारी दर्शवली. विरोधकांकडून सरकारवर आरोप-प्रत्यारोप, टीका टोले मारणे हे प्रकार साहजिकच घडतात. पण गेल्या काही दिवसांपासून सरकारमध्ये मांडीला मांडी लावून बसणारी शिवसेना आणि स्वाभिमान संघटनेने भाजप सरकारविरोधात दंड थोपटले आहे. त्यामुळे सध्याच्या राजकारणात कटप्पा आणि बाहुबलीचा खेळ रंगला आहे. पण राज्यात कोण कटप्पा आणि कोण बाहुबली हाच खरा प्रश्‍न आहे.

विधान परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील तटकरे आणि विधानसभेत जयंत पाटील यांनी चांगलीच बॅटिंग केली. केंद्रातील आणि राज्यातील सत्तेत शिवसेना एकत्रितपणे नांदत असतानाच, शिवसेनेच्या विरोधाची तटकरे यांच्यासह अनेकांनी खिल्ली उडवली. शिवसेना आणि नारायण राणे म्हणजे 36चा आकडाच. मग राणेही गप्प बसतील का? शिवसेनेवर आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर राणे यांनी त्यांच्या स्टाइलने प्रहार केला. शिवसेना सत्तेला कशी चिकटून आहे. लाथ मारली तरी सत्तेतून बाहेर पडणार नाही, असे वक्तव्य राणे यांनी केले. बाळासाहेबांची शिवसेना आणि आताची शिवसेना यावर यांनी जोरदार प्रहार केला. शिवसेनेचा घाव जिव्हारी लागल्याने शिवसेनेचे अनिल परब यांनीही राणेंना चांगलाच टोला हाणला. शिवसेनेत असतानाच रुबाब आम्ही पाहिला. शिवसेना सोडल्यानंतर तुमचा रुबाब संपला, अशा शब्दांत परब यांनी राणेंचा टोला परतवला. त्यामुळे राणे-परब जुगलबंदीचा सामनाही पाहावयास मिळाला. जीएसटी लागू होत असल्याने विरोधकांनी स्वागत करीत असतानाच त्यातील धोके अडथळे त्रुटी त्यांनी सांगितल्या. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे नारायण राणे, सुनील तटकरे, शरद रणपिसे तर विधानसभेत जयंत पाटील, अजित पवार, दिलीप वळसे पाटील यांच्यासह आदींची जीएसटीवर अभ्यासपूर्ण भाषण झाली हे नाकारता येणार नाही, पण जीएसटीपेक्षा राजकीय चिमटे आणि टोमणे हेच अधिक दिसून आले. शिवसेनेच्या प्रवक्त्या व आमदार नीलम गोर्‍हे यांनी शेतकर्‍यांना कर्जमुक्ती आणि विजय जाधव यांच्याकडून पोलिसांनी हिसकावून घेतलेला अस्थिकलश परत करण्याची मागणी लावून धरली. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना सरसावली आहे. शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची संघर्षयात्रा काढली. त्यानंतर सेनेची शिव संवाद अभियान आणि आता भाजपची शिवार संवाद यात्रा सुरू आहे. स्वाभिमान संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांची आत्मक्लेश यात्रा सुरू आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्येचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे, पण अजूनही सरकार कर्जमुक्तीसाठी वेळ शोधत आहे. यांसारखे दुर्दैव काय म्हणावं. मग फडणवीस सरकार असंवेदनशील आहे, असा आरोप शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांनी केला, तर तो चुकीचा कसा म्हणता येईल. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाच्या माध्यमातून मध्यावधी निवडणुकीची चाचपणी राजकीय पक्षांकडून सुरू आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. राज्यातील नगर परिषद जिल्हा परिषद असो वा पंचायत समिती सगळ्याच निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवलं. त्यामुळे भाजपचा आत्मविश्‍वास वाढला आहे. पनवेल, भिवंडी आणि मालेगाव या तीन महापालिकांचा निकाल नुकताच लागला. भिवंडी व मालेगावमध्ये काँग्रेसने यश मिळवले. पण मुंबईच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या पनवेलमध्ये भाजपने एक हाती सत्ता मिळवली. या ठिकाणी शिवसेनेला खातेही उघडता आले नाही. खरं तर हा विजय माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूरया पित्रापुत्रांचाच आहे हे भाजपही नाकारू शकत नाही. रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील तीन जिल्ह्यांमध्ये केवळ प्रशांत ठाकूर हे एकमेव भाजपचे आमदार निवडून आले आहेत. पनवेल महापालिका निवडणुकीची जबाबदारी शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर यांच्यावर सोपवण्यात आली होती. शिवसेनेसाठी हा खूप मोठा हादरा आहे. पनवेलच्या पानिपतची कारणे शिवसेनेला शोधावीच लागणार आहेत. पनवेलच्या निकालानंतर शिवसेनेच्या नेतृत्वाने आत्मपरीक्षण करण्याची खरी गरज असून राज्यातील राजकारणातील कटप्पा नि बाहुबलीचा खेळ अजून कसा आणि किती रंगतोय हेच नजिकच्या काळात पहावयास मिळणार आहे.
संतोष गायकवाड – 9821671737