कटर, टॉमी सापड्याने उडाला गोंधळ!

0

जळगाव। शहरातील जे.टी.चेंबरमधील वायरलेस वर्ल्ड मोबाईल दुकान फोडून 16 लाखांच्या मोबाईल चोरीची घटना घडल्याच्या दुसर्‍या दिवशी आज शनिवारी सकाळी 10 वाजता नेहरू चौकातील मोहिनी पुस्तक भांडार या पुस्तक विक्रीच्या दुकानाजवळ मोठे कटर व टॉमी आढळून आल्याने गोंधळ उडाला. दुकान मालकांनी लागलीच शहर पोलिस ठाण्यात माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी करत टॉमी व कटर ताब्यात घेतले. मोबाईल दुकान फोडण्यासाठी याच टॉमीचा वापर केला असावा असा संशय व्यक्त करण्यात आला परंतू दोन्ही अवजारे तपासणीत नवे असल्याने ते वापरलेच गेले नसल्याचे आढळून आले. यावेळी परिसरातील नारिकांनी दुकानाजवळ चांगलीच गर्दी केली होती.

अन्… पोलिसांना दिली माहिती
शनिपेठ परिसरातील चौघुल प्लॉट भागातील रहिवासी कैलास अंबिकाप्रसाद तिवारी यांचे 30 वर्षांपासून नेहरू चौकात मोहिनी पुस्तक भांडार पुस्तक विक्रीचे छोटेसे दुकान आहे. शुक्रवारी नेहमी प्रमाणे सकाळी 9 वाजता कैलास तिवारी हे दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना दुकानाजवळ टॉमी व कटर आढळून आले. बर्‍याचदा कामगार येथे साहित्य ठेवून देतात व नंतर घेवून जातात असा अनूभव असल्याने त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करून अवजार दुकानाच्या एका कोपर्‍यात ठेवून दिले. पुन्हा आज शनिवारी दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना टॉमी आणि कटर पडलेले दिसले. यानंतर वृत्तपत्रात जे.टी.चेंबर्स मधील चोरीची घटना वाचताच त्यांनी तात्काळ शहर पोलिस ठाण्याचे डिबी कर्मचारी दृश्यंत खैरनार व संतोष भालेराव यांना या बेवारस अवजारांबद्दल माहिती दिली.

घटनास्थळी आले बाँब शोध पथक
कैलास तिवारी यांनी शहर पोलिस स्टेशनसह पोलिस मुख्यालयातील नियंत्रण कक्षात बेवारस कटर आणि टॉमी मिळून आल्याची माहिती दिली होती. मात्र, नियंत्रण कक्षातील कर्मचार्‍यांनी एैकण्यात गल्लत केल्याने त्यांनी नेहरू चौकात त्यांनी श्‍वान पथक न पाठवता चक्क बाँब शोध पथक पाठविले. यामुळे नेहरू चौकात बाँब शोध पथकाने पाचारण केल्याने चांगलाच गोंधळ उडाला होता. कैलास तिवारी यांच्या दुकानाजवळ मात्र, कटर आणि टॉमी मिळून आल्याने परिसरातील नारिकांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

अनेक चर्चेला उधाण
तिवारी यांच्या पुस्तक विक्रीच्या दुकानाजवळ बेवारस टॉमी आणि कटर सापडल्याने नेहरू चौकात चर्चेला उधाण आले होते. जे.टी.चेंबर येथील मोबाईल दुकान फोडून चोरटयांनी हे अवजार दुकानाजवळ फेकून दिले असावे, नाहीतर.. त्यांचा कोणी पाठलाग केला असावा म्हणून फेकले असावे. जे.टी.चेंबर्समधील तपासाची दिशाभूल करता यावी यासाठी येथे अवजार फेकले असावे, अशा या चर्चांना उत आला होता. तर पोलिसांच्या तपासणीत अवजार हे नवेच असून ते अजून वापरले गेले नसल्याचे प्राथमिक तपासणी समोर आले आहे.

श्‍वान पथकाचेही पाचारण
बेवारस अवजारांची माहिती मिळताच शहर डिबी पथकातील दृश्यंत खैरनार, संतोष भालेराव, अकरम शेख, इम्रान सैय्यद, अमोल विसपुते, दिपक सोनवणे या कर्मचार्‍यांनी लागलीच नेहरू चौकातील घटनास्थळ गाठले. यावेळी जिल्हा पेठ पोलिस ठाण्याचे कर्मचारी रवि नरवाडे हे देखील घटास्थळी हजर झाले होते.

कैलास तिवारी व त्यांचे भाऊ मोहन तिवारी यांनी पोलिसांना दुकनाजवळ ठेवलेले कटर आणि टॉमी दाखवले. यानंतर श्‍वान पथकाने पाचारण केले असता हॅप्पी या श्‍वानाकडून तपासणी करण्यात आली. कटर व टॉमी नवे असल्याने प्रथम दर्शनी ते वापरलेच गेले नसल्याचे दिसून येत होते. पोलीसांनी कटर आणि टॉमी ताब्यात घेवून शहर पोलीस ठाणे गाठले.