कट्टर धर्मांधतेला वेळीच रोखा

0

डॉ.युवराज परदेशी:

गेली अनेक दशके भारत दहशतवादाच्या आगीत होरपळत असताना अमेरिकेसह युरोपातील अनेक देश हा भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचे सांगत यापासून चार हात लांब होते. दहशतवाद हा केवळ एका देशाचा प्रश्‍न नसून हा आंतरराष्ट्रीय विषय असल्याचे भारत ओरडून ओरडून संपूर्ण जगाला सांगत होता. मात्र भारताकडे सोईस्कर दुर्लक्ष करण्यात आले. अमेरिकेसह युरोपमधील अनेक देशांना दहशतवादाचे चटके बसल्यानंतर भारताचे म्हणणे आता जगाला पटू लागले आहे. सिरीया, अफगणिस्तामध्ये रक्ताचे पाट सांडणार्‍या इसिस (आयएसआयएस) या कुख्यात दहशतवादी संघटनेने अलीकडच्या काही वर्षात युरोपवर लक्ष केंद्रीत केले आहे. फ्रान्समध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जखम अद्याप ताजी असताना आता युरोपमधील आणखी एका देश ऑस्ट्रियाच्या व्हिएन्ना शहरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 5 जणांचा मृत्यू आणि 22 जण जखमी झाले. या घटनेनंतर इसिस या कुख्यात दहशतवादी संघटनेच्या रक्तपातामुळे संपूर्ण युरोपमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

सिरिया व इराकमध्ये निर्घृण आणि अमानुष हिंसाचार घडवणार्‍या इसिसने आता युरोप व आशियामध्ये लक्ष केंद्रीत केले आहे. युरोपबद्दल बोलायचे म्हटल्यास, ब्रसल्स मधल्या यहुदी संग्रहालयावर मे 2014 मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर युरोपमध्ये दहशतवादी हल्ल्यांची सुरु झालेली मालिका थांबण्याचे नावच घेत नाहीये. युरोपमधील शेकडो नागरिक दहशतवादात मृत्युमुखी पडले आहेत. या हल्ल्यांमधील जवळपास अनेक हल्ल्यांची जबाबदारी आयसिस या दहशतवादी संघटनेने घेतील आहे. 2014 पासून युरोप खंडात अल्पसंख्यांक, सामाजिक, राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या मुलतत्ववाद्यांच्या असंतोष, द्वेष, तिरस्कारातून निर्माण झालेली चीड अशांतता आणि दहशत पसरवत आहे. जर्मनी आणि फ्रान्सलाही याची मोठी किंमत मोजावी लागली आहे. आता आस्ट्रियालाही याची झळ बसली आहे. काही वर्षांपूर्वी सुरु झालेला हा दहशतवाद युरोपमध्ये येणार्‍या काळातही आसाच धुमाकूळ घालत राहील असेच चित्र दिसत आहे. दहशतवादाकरिता युरोप ही सुपीक भूमी झाली आहे.

इसिसने इराक, सीरिया आदी देशांत काही वर्षांपूर्वी जो युद्धाचा आगडोंब उसळवला होता, त्यामुळे त्या देशांमधील हजारो नागरिकांनी युरोपिय देशांकडे धाव घेतली. या स्थलांतरितांचे लोंढेच्या लोंढे युरोपवर आदळले. युद्धग्रस्त भागातून युरोपमध्ये येणारे निर्वासितांचे लोंढे आणि धीम्या आर्थिक प्रगतीमुळे दहशतवाद झपाट्याने पसरत चालला आहे. सुरक्षा विषयक तज्ञांच्या मते, बेल्जिअम आणि फ्रान्स या देशातून अनेक लोकं आयसिस या संघटनेत सामील झालेत. युरोपमध्ये अनेक वर्षांपासून स्थायिक झालेल्या अनेक मुस्लिम नागरिकांची आर्थिक स्थिती सामान्यच आहे. त्यामुळे तेथील तरुणांमध्ये मूलतत्ववाद रुजवणे सहज शक्य होते आणि सध्या युरोपमध्ये असेच घडतांना दिसत आहे. तालिबान किंवा इसिस याच्याही पलीकडे युरोपमध्ये वावरणार्‍या संघटना खतरनाक आहेत. गेल्या 16 वर्षात स्वित्झर्लंड, लंडन, माद्रीद, पोटोया, नॉर्वे, ब्रसेल, पॅरिस अशा युरोपमधील अनेक राष्ट्रांत दहशतवाद्यांनी हल्ले करून हजारो निरपराध लोकांना ठार केले आहे. अतिरेकी वंशवाद, वर्णद्वेष आणि परकीय नागरिकांबद्दलचा तिरस्कार वाढीस लागल्याने रक्तपात वाढतांना दिसत आहे.

आशियामध्ये मुख्यत्वे करून भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या चार देशांकडे इसिसचे लक्ष आहे. या चारही देशांमध्ये मुस्लिम लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे आणि तेथे गरिबीचे, बेरोजगारीचे प्रमाणही मोठे आहे. त्यामुळे येथे जाळे विणणे सोपे आहे, अशी इसिसची अटकळ आहे. इसिसचा भारतात प्रवेश सुरुवातील केवळ काश्मीरपुरता मर्यादित मानला जात होता. काश्मीरमध्ये सुरक्षा दलावर झालेल्या दगडफेकी दरम्यान इसिसचे काळे झेंडे अनेकवेळा फडकवल्या गेल्याने त्यास पुष्टी मिळाली. मात्र त्यानंतर गेल्यावर्षी कल्याणचे चार तरुण इराकमध्ये जावून इसिस मध्ये सहगाभी झाल्याची माहिती समोर आल्यानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या होत्या. त्यानंतर इसिसचा ट्विटर हँडलर बंगळुरू मधून जेरबंद झाला. तो बंगळुरूमध्ये बसून ट्विटरद्वारे लोकांना इसिसमध्ये सामील होण्यासाठी प्रेरित करायचा. या सर्व घडामोडींचा तपास प्राथमिक अवस्थेत असताना इसिसचा भारतातील प्रवक्ता बनण्यास निघालेल्या नवी मुंबईतील जुबेर खानला महाराष्ट्र एटीएसने दिल्लीत अटक केली होती.

मराठवाड्यातून पकडलेल्या तरुणांकडे स्फोटकेही सापडली होती. गेल्या वर्षी राष्ट्रीय चौकशी समिती (एनआयए) द्वारे दिल्ली आणि उत्तरप्रदेशच्या वेगवेगळ्या भागांतून इसिसशी संबंधित 10 संदिग्ध आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून इसिसच्या नव्या मॉड्युलचाही खुलासा झाला होता. युरोपिय देशांप्रमाणे रक्तपात न घडविता ही संघटना फेसबुक, ट्विटर, व्हॉटसअ‍ॅप, युट्यूब यांसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला प्रसार करण्यास प्राधान्य देत आहे. कदाचित हे त्यांचे प्राथमिक धोरण असल्याचे नाकारता येणार नाही. जगभरातील मुस्लिम राष्ट्रातील मुस्लिमांशी तुलना करता भारतातील मुस्लिम सुरक्षित आहे. भारतामध्ये मुस्लिमांना सर्व पातळीवर समान राजकीय अधिकार व स्वातंत्र्य दिले गेलेले आहेत. यामुळे येथील मुस्लिम इसिसच्या आहारी जाणार नाही मात्र असे असले तरी तरुण वर्गात इसिसविषयी वाढणारे आकर्षण ही चिंतेची बाब आहे. सध्या भारताला इसिसचा धोका अत्यल्प असला तरी भविष्यात तो वाढणार आहे हे नाकारून चालणार नाही. ज्या चुका युरोपिय देशांनी केल्या त्याची जबर किंमत त्यांना चुकवावी लागत आहे.

जातीय राष्ट्रवाद, भेदभाव, सामाजिक आर्थिक पत यासारख्या अनेक कारणामुळे दहशतवाद पसरत असण्याची शक्यता आहे. जनतेला चांगले शिक्षण, धार्मिक, जातीय किंवा वांशिक भेदभाव न बाळगता दहशतवादाला पाठिंबा देणार्‍यांना अधिक कठोर शासन, सोशल मीडियावर बारीक नजर ठेवणे, शिक्षण आणि रोजगार संधींच्या माध्यमातून मुस्लिम समाजातील वेगळेपणाची भावना दूर होऊन दहशतवाद कमी होण्यास मदत होऊ शकते. यासाठी युरोपसह संपूर्ण जगाला विशेष धोरण आखावे लागणार आहे. अन्यथा कट्टर धर्मांधतेच्या नावाखाली सामान्य तरुणांची माथी भडकविण्याचे काम तालिबान, इसिससारख्या दहशतवादी संघटना सुरुच ठेवतील.