कोर्हाळे । सोमेश्वर, होळ तसेच पणदरे, माळेगाव, शारदानगर, बारामती येथील महाविद्यालयात जाणार्या आसपासच्या गावातील विद्यार्थ्यांना निरा-बारामती महामार्गावरील कठीण पुल बस थांब्यावर यावे लागते. मात्र, भरधाव वाहनांमुळे या मार्गावरून विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून महामार्ग ओलांडावा लागतो. त्यामुळे या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता असल्याने येथे गतिरोधक बसविण्याची मागणी विद्यार्थ्यांसह पालकांकडून होत आहे.
सांगवीकडून येणारा रस्ता या मार्गाला मिळत असल्यामुळे या चौकात नेहमीच वर्दळ असते. मागील वर्षातच या चौकाचे रुंदीकरण करण्यात आले आहे. या दरम्यान चौकात सांगवीकडून येणार्या रस्त्यावर गतिरोधक उभारल्यामुळे वाहनांची गती कमी होत आहे. मात्र याच ठिकाणी निरा-बारामती महामार्गावर गतीरोधक नसल्यामुळे तिव्र वळण असतानाही वाहने भरधाव वेगाने जातात. मागील काही दिवसात अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे भविष्यात मोठा अपघात होण्याआधी गतिरोधक बसवावेत, अशी मागणी रामचंद्र जाधव, धनंजय पडवळ, सुनील पडवळ, यशवंत कोढांळकर, संजय शिंदे, महेंद्र जगताप, अरुण कोरडे, नंदु सावंत, विक्रम थोपटे यांनी केली आहे.