कठुआत बलात्कार झालाच नाही

0

गांधीनगर । देशभर मानवतेला हादरा देणार्‍या कठुआ बलात्कार आणि हत्याप्रकरणात साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर हिने वादग्रस्त विधान केले आहे. तेथे बलात्कार झालाच नाही फक्त हत्या झाली, असे साध्वीने म्हटले आहे. नवसारीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात साध्वी प्रज्ञा ठाकूरने वादग्रस्त विधान केले आहे. ती म्हणाली की, कठुआ प्रकरण एक असे षडयंत्र आहे, जे ऐकून मनात एका विशेष जातीवर्गासाठी घृणा निर्माण होते, जे मुस्लीम, काँग्रेस आणि डावे आहेत. एवढे घृणास्पद कृत्य ज्याला बलात्कार म्हटले जाते, तो झालाच नाही. तिची केवळ हत्या झाली, हे वैद्यकीय अहवाल सांगतो, असे साध्वीने म्हटले आहे.

फॉरेन्सिकच्या अहवालात दुष्कृत्याचे पुरावे
कठुआ प्रकरणात पुराव्यांसोबत छेडछाडीची शक्यता लक्षात घेता, राज्य फॉरेन्सिक लॅबऐवजी पुरावे तपासणीसाठी दिल्लीच्या लॅबमध्ये पाठवले. त्यात मुलीसोबत बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनास्थळावरुन मिळालेल्या आरोपींच्या डीएनए नमुन्यांवरुन सिद्ध होते की, मंदिरातच मुलीसोबत क्रूरकृत्य झाले. आरोपीच्या कपड्यावर आणि मंदिरात मिळालेले रक्ताचे डाग आणि तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचे फॉरेन्सिकच्या अहवालात स्पष्ट झाले आहे.