कठुआ नृशंसकांड; कोंढवा पोलिसांत तक्रार

0

भाजप मंत्र्यांविरोधात देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा
फास्ट ट्रॅक कोर्टासाठी मेहबुबांचे मुख्य न्यायाधीशांना पत्र
नराधमांना कठोर शिक्षा करा, संयुक्त राष्ट्रानेही भारताला फटकारले

पुणे/नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथील आठ वर्षाच्या चिमुरडीवर झालेला अमानुष लैंगिक अत्याचार व हत्याकांडप्रकरणी पुण्यातील कोंढवा पोलिस ठाण्यात भाजपच्या दोन मंत्र्यांसह इतर समर्थकांविरुद्ध ज्येष्ठ विधिज्ज्ञ तोसिफ शेख व पुणे वकिल संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. कुमार कलेल यांनी फौजदारी तक्रार दाखल केली आहे. तसेच, या प्रकरणाची सुनावणी जम्मू-काश्मीरच्याबाहेर चालविण्यात यावी, अशी मागणीही या विधिज्ज्ञांनी केली आहे. राजीनामा दिलेल्या त्या मंत्र्यांविरोधात देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्याची मागणीही या फिर्यादीत करण्यात आली. दरम्यान, घडलेली घटना अत्यंत नृशंस असून, या प्रकरणाच्या सुनावणीसाठी फास्ट ट्रॅक कोर्ट गठीत करण्याची विनंती मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी पत्राद्वारे जम्मू-काश्मीर मुख्य न्यायाधीशांकडे केली आहे. दुसरीकडे, या घटनेची संयुक्त राष्ट्रसंघानेदेखील गांभीर्याने दखल घेत, या प्रकरणातल्या नराधमांना कठोरतम शिक्षा झाली पाहिजे. हे प्रकरण अत्यंत भयंकर आहे, असे संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटिनो गेटर्स यांनी भारताला ठणकावले आहे.

कठोरातले कठोर शासन व्हावे!
कठुआ आणि उन्नाव या दोन ठिकाणी झालेल्या बलात्काराच्या प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला आहे. या मुलीवर मंदिरात आठ दिवस बलात्कार झाला. त्यानंतर दगडाने ठेचून तिची हत्या करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाने देशभरात संताप व्यक्त होत आहे. तर काँग्रेसने या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत पंतप्रधान या प्रकरणी गप्प का असा प्रश्‍न विचारला आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कठुआ आणि उन्नाव प्रकरणातल्या नराधमांना मुळीच माफ करणार नाही, असे म्हटले होते. या आरोपींना कठोरातले कठोर शासन होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. देशभरात या सगळ्या प्रकरणाचे पडसाद उमटलेले असतानाच आता संयुक्त राष्ट्रांनीही याची दखल घेतली असून, आरोपींना कठोरातले कठोर शासन व्हावे आणि पीडित मुलीला न्याय मिळावा, असे म्हटले आहे. नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी देशातील नागरिक करत आहेत.