नवी दिल्ली : कठुआ बलात्कार आणि हत्या प्रकरणातील महत्वाचा पुरावा तपास यंत्रणांना प्राप्त झाला आहे. या प्रकरणातील पीडितेच्या लैंगिक अवयवामध्ये आरोपीच्या वीर्याचे अंश आढळल्याचा फॉरेन्सिक अहवाल समोर आला आहे. या प्रकरणातील नराधमांना शिक्षा देण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा पुरावा मानला जात आहे. दिल्लीच्या फॉरेन्सिक लॅबने या संदर्भातला अहवाल दिला आहे.
अत्यंत क्रूरपणे दगडाने ठेचून हत्या
जम्मू-काश्मीरमधील कठुआ या ठिकाणी एका 8 वर्षांच्या मुलीवर सात दिवस बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर तिची अत्यंत क्रूरपणे दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. या सगळ्या प्रकरणाचे पडसाद देशभरात उमटले. त्यानंतर आता फॉरेन्सिक अहवालाच्या मदतीने पोलिसांच्या हाती भक्कम पुरावा लागला आहे. फॉरेन्सिक लॅबमध्ये या प्रकरणातील 14 पाकिटे तपासण्यात आली. त्यात त्यांना पीडित मुलीच्या लैंगिक अवयवामध्ये आढळलेल्या वीर्याचे अंश हे आरोपीशी जुळत असल्याचे दिसून आले आहे. मृत पीडितेचा व्हिसेरा आणि आरोपींच्या रक्ताचे नमुने एकमेकांशी जुळले आहेत. बलात्कार झालेल्या पीडित मुलीच्या अंगावरील कपड्यांना लागलेली माती, रक्ताचे डाग हेदेखील तपासण्यात आले. हे डाग 1 ते 21 मार्च या कालावधीतले आहेत, असेही लॅबने म्हटले आहे.
पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्नही उघड
पोलिसांनी ज्या नराधमांचे रक्ताचे नमुने घेतले आहेत त्यांच्या डीएनए पीडितेच्या अंगावर सापडलेल्या रक्ताशी, गुप्तांगातील वीर्याशी जुळला आहे. या प्रकरणातला हा मोठा पुरावा मानला जातो. या पुरावाच्या आधारे या नराधमांना कठोरातली कठोर शिक्षा होण्यास हातभार लागणार आहे. या मुलीच्या दोन केसांचे नमुनेही आम्ही फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले होते. हे केस आम्हाला मंदिरात सापडले होते. आम्हाला सापडलेल्या दोन केसांपैकी एक पीडित मुलीचा आणि एक आरोपीचा असल्याचे समजले आहे. या मुलीच्या फ्रॉकवर असलेले डाग डिटर्जंट पावडने धुण्याचा प्रयत्न झाला आहे हेदेखील अहवालात समोर आले आहे.