कडव्या झुंजीने कसोटीचा वाढवला रोमांच

0

हैदराबाद: हैदराबादेत एकमेव कसोटी सामन्यात बांगलादेश संघाला सहज गुंडाळून भारतीय संघ फॉलोऑन देईल असे वाटत असताना बांगलादेश फलंदाजांनी मात्र भारतीय गोलंदाजांना कडवी झुंज दिली आहे. शाकीब अल हसन, मुशफिकूर रहिम आणि मेहदी हसन यांनी झळकाविलेल्या अर्धशतकामुळे बांगलादेशने भारताला कडवा प्रतिकार केला. भारतीय फिरकी गोलंदाजांना निष्प्रभ ठरवत रहिम आणि हसन यांनी आज (शनिवार) तिसऱ्या दिवसअखेरपर्यंत फलंदाजी करत 6 बाद 322 धावा केल्या. 1 बाद 41 धावसंख्येवर आजच्या दिवसाचा खेळ सुरु करणारा बांगलादेश संघ ऑल आऊट होण्यास जास्त वेळ लागणार नाही अशी अपेक्षा होती. मात्र तसं न होता, बांगलादेश फलंदाजांनी चिकाटीने फलंदाजी करत दिवसाअखेर 6 विकेट्स गमावत 322 धावा केल्या आहेत. शाकिब हसन आणि कर्णधार मुशफिकूर रहिम यांनी यामध्ये महत्वाचा वाटा उचलला. शाकिबने 82 धावा केल्या तर मुशफिकूर नाबाद 81 धावांवर खेळत आहे.

सुरुवातीच्या धक्क्यानंतर सावरले

पहिल्या डावात धावांचा डोंगर उभारणा-या भारताने तिस-या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर बांगलादेशला दोन धक्के दिले. सुरुवातीच्या धक्क्यानंतर शाकीब अल हसन आणि कर्णधार मुशाफीकुर रहीम यांनी बांगलादेशचा डाव सावरला. अजूनही बांगलादेशचा संघ 365 धावांनी पिछाडीवर आहे. भारताने पहिल्या डावात 6 बाद 687 धावा केल्या आहेत. उमेश यादवने दोन विकेट्स घेतल्या असून जाडेजा, अश्विन आणि इशांत यांना प्रत्येकी एक-एक विकेट मिळवण्यात यश मिळाले आहे. बांगलादेशला धावांची गती कायम राखता आली नाही किंवा एकाही फलंदाजांना मैदानावर जम बसवता आले नाही. बांगलादेशची सुरूवात अडखळतच झाली. उमेश यादवने दोन बळी टिपले. तर इशांत शर्मा आणि रविचंद्रन अश्‍विनलाही प्रत्येकी एक बळी टिपण्यात यश आले. शकिब हसन 103 चेंडूत 82 धावा करून पतरला.

जेवणानंतर बांगलादेशचा डाव सावरला

भारताने दमदार सुरुवात करत चार खेळाडूंना पटापट तंबूत पाठवले. परंतु त्यानंतर शकिब हसन, मुशफिकर रहीम आणि मेहेदी हसन मिराज यांनी अत्यंत संयमाने खेळ करत धावसंख्या वाढवली. अद्यापही बांगलादेश भारताच्या ३६५ धावांनी पाठीमागे आहे. भारताने बांगलादेश ६८७ धावांचे आव्हान दिल्यानंतर बांगलादेश डावाला सुरुवात झाली. तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्राला सुरुवात झाल्यानंतर काही वेळातच बांगलादेशचा डाव घसरण्यास सुरुवात झाली. दिवसाच्या सुरुवातीलाचा ६४ धावांवर त्यांना तीन गडी गमवावे लागले. १२ धावांवर खेळत असताना मोमीनुल हकला उमेशने पायचित केले. बांगलादेश विरुद्ध भारत कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचे पहिले सत्र उमेश यादवने गाजवले. तिसऱ्या ओव्हरमध्येच त्याने तामिम इकबालला धावबाद करुन भारतासाठी चांगली सुरुवात केली. तसेच त्याने मोमीनुल हकला पायचितही केले. त्याला रिव्हर्स स्विंगही चांगले मिळू लागले त्यामुळे कमी धावा देऊन बांगलादेशच्या खेळाडूंवर त्याने आपला वचक निर्माण केला. जेवणानंतर बांगलादेशचा डाव थोडासा सावरला. शाकिबने ७८ चेंडूमध्ये ५७ धावा केल्या. त्याला मुशफिकरची साथ मिळाली आहे. एका पाठोपाठ एक फलंदाज तंबूकडे परतत होता. त्यावेळी मुशफिकरने संयमाने खेळी केली.

सामन्याची उत्कंठा शिगेला पोचली

कर्णधार विराट कोहलीने सलग चौथ्या कसोटी मालिकेत चौथे द्विशतक झळकावण्याचा पराक्रम केला. विराटच्या कामगिरीच्या जोरावर भारताने बांगलादेशच्या कमकुवत गोलंदाजीविरुद्ध एकमेव कोसटी सामन्यात दुसऱ्या दिवशी ६ बाद ६८७ धावसंख्येवर पहिला डाव घोषित केला. भारताने ६ बाद ६८७ धावांची मारलेली मजल विक्रमी ठरली आहे. कारण यापूर्वी कुठल्याही संघाला सलग तीन कसोटी सामन्यांत ६०० धावांच्या पुढे मजल मारता आलेली नाही. यापूर्वी भारताने इंग्लंडविरुद्ध मुंबई व चेन्नई कसोटी सामन्यात ६०० धावांची वेस ओलांडण्याचा पराक्रम केला आहे. आता या सामन्याची उत्कंठा अजून शिगेला पोचली असून सामन्याचे दोन दिवस शिल्लक आहेत.

मास्टर ब्लास्टरकडून विराटची मुक्तकंठाने प्रशंसा

भारताचा कर्णधार विराट कोहलीने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात द्विशतकी खेळी साकारल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने कोहलीचे कौतूक केले आहे. कोहलीने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात २०४ धावांची जबरदस्त खेळी साकारली होती. तेंडूलकरने ट्विटरवरील संदेशाच्या माध्यमातून विराटची मुक्तकंठाने प्रशंसा केली. तुझ्या बॅटवर असलेला स्वीट स्पॉट तू किती जबरदस्त फॉर्ममध्ये आहे हे सांगतं. त्यासाठी स्कोअरबोर्डची गरज नाही. देव करो तुझी बॅट नेहमी तळपत राहो, असे सचिनने या ट्विटमध्ये म्हटले आहे.

बांगलादेशविरुद्धचा सध्याचा सामना विचारात घेतल्यास विराट कोहली त्याचा ५४ वा कसोटी सामना खेळत आहे. या कालावधीत त्याने १६ शतके आणि १४ अर्धशतकांच्या मदतीने ४४१३ धावा केल्या आहेत. याउलट सचिनने त्याच्या पहिल्या ५४ कसोटी सामन्यांमध्ये ११ शतके आणि १६ अर्धशतके केली होती. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांकडून साहजिकच सचिन तेंडूलकर आणि विराट कोहली यांची तुलना केली जाते. भारताकडून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आणि विरेंद्र सेहवागने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त सहा द्विशतके केली आहेत. तर राहुल द्रविडने पाच वेळा द्विशतक झळकावले आहे. त्यामुळे कोहली आता हा विक्रम कधी सर करणार, याची चाहत्यांना उत्सुकता आहे.