पुणे – पत्नीसोबत झालेल्या कडाक्याच्या भांडणानंतर पतीने तिचा ओढणीने गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या सर्व प्रकारानंतर पतीने घराला कुलूप लावून हडपसर पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना सर्व प्रकार सांगितला. ही घटना सोमवारी (दि.21) मध्यरात्री साडे बारा वाजता घडली.
माधुरी आकाश चव्हाण (22, रा. हडपसर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी तिचा पती आकाश चव्हाण (27) याला अटक केली.
आकाश आणि माधुरी यांच्यात सोमवारी रात्री कडाक्याचे भांडण झाले. आई-वडिलांना पत्नी सांभाळत नाही. घरात छोट्या-मोठ्या कारणावरून भांडत असते. याचा राग आल्यामुळे आकाशने ओढणीने माधुरीचा गळा आवळला आणि तिचे तोंड उशीने दाबून खून केला. त्यानंतर आकाश घराला कुलूप लावून लहान मुलीला घेऊन आईकडे गेला. मुलीला तेथे ठेवले आणि थेट पोलीस ठाणे गाठले. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला.