कडुस । खेड तालुक्याच्या पश्चिम भागात महत्वाचा असणारा कडुसचा बंधारा गेले आठवडाभर झालेल्या दमदार पावसाने तुडुंब भरला आहे. या पाण्याचे पूजन खेड तालुक्याचे आमदार सुरेश गोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
हा बंधारा कडुस गाव आणि पंचक्रोशीतील पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा महत्वाचा स्रोत आहे. यातूनच कडूस गारगोटवाडी व इतर वाड्यावस्त्यांना पिण्याचे पाणी पुरवले जाते. तसेच भैरवनाथ पाणी वाटप संस्थांच्यामार्फत शेतकर्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून दिले जाते. गाळमुक्त धरण या शासनाच्या धोरणानुसार नुकताच या उन्हाळ्यात या धरणातून जवळपास 3 हजार ट्रक इतका गाळ उपसा करून तो शेतकर्यांनी शेताची सुपिकता वाढविण्यासाठी नेला. या कामी आमदार सुरेश गोरे यांनी काही कंपन्यांमार्फत यंत्रसामुग्री उपलब्ध करून दिली होती. तसेच स्थानिक पातळीवर काम करणार्या गांधीयन्स संस्थेनेही या कामी मदत केली होती. त्यामुळे यंदा बंधार्यात जास्त पाणी साठा होईल अशी आशा आहे. जि. प. सदस्या तनुजा घनवट, एल.बी.तनपुरे, कडुसच्या सरपंच शशिकला ढमाले, गारगोटवाडीचे ऊपसरपंच जितेंद्र काळोखे, माऊली तुपे, बाळासाहेब ढमाले, भैरवनाथ पाणी वाटप संस्थेचे अध्यक्ष दिलीप ढमाले, बाजीराव गारगोटे, मधुकर गारगोटे व ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते.